भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रीपद गमावलेले एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात अविनाश भोसले यांच्यावर एकनाथ खडसेंनी मेहेरबानी दाखवल्याने राज्याचे तब्बल एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपांवर अद्याप एकनाथ खडसेंकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पुण्यात आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत मेनन यांनी पुण्यात अविनाश भोसले यांच्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप मेनन यांनी केला आहे. खडसे यांनी भोसले यांचे ५० कोटी रुपये वाचवण्यासाठी जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशांना स्थगिती दिली आणि यामुळे राज्य सरकारचे एक हजार कोटी बुडाले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे अविनाश भोसले आणि एकनाथ खडसे हे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.