आपल्या वक्तव्यांमुळे आणि टीका करण्याच्या शैलीमुळे कायमच चर्चेत असणारे भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ असं म्हटलं आहे. श्रीरामपुरमध्ये स्थानिकांसमोर जाहीर भूमिका मांडताना नितेश राणेंनी फडणवींचा ‘हिंदूहृदयसम्राट’ असा उल्लेख केल्यानंतर आता राज्यामध्ये भाजपासोबत सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत असल्याचं वारंवार सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने फडणवीसांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणणाऱ्या नितेश राणेंची पाठराखण केली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
श्रीरामपुरमध्ये बोलताना नितेश राणेंनी स्थानिक अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा देत ‘हिंदूहृदयसम्राट’ असा फडणवीस यांचा उल्लेख केला. “महाराष्ट्रात हिंदुतत्वादी सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कट्टर हिंदूत्ववादी आहेत. हिंदूहृदयसम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस आहेत. हे या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. कुठलाही अधिकारी आमच्या हिंदू मुलाकडे वाकड्या नजरेने बघेल तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत. हा इशारा या निमित्ताने देतोय,” असं नितेश राणेंनी आपल्या भाषणात म्हटलं.

शिंदे गटाकडून शिवरायांचा संदर्भ…
नितेश राणेंच्या या विधानासंदर्भात शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करताना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. “आपण छपत्रपती म्हणतो. पण आजही राजघराण्यातील काही लोक आहेत जे आमदार-खासदार झालेत. त्यांच्या ठिकाणी जेव्हा दसरा साजरा होतो. तेव्हा त्यांना छत्रपती म्हटलं जातं. असं छत्रपती म्हटल्याने शिवाजी महाराजांचा मान कुठे कमी होतो का?” असा प्रश्न पावस्कर यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती या शब्दाचा वापर इतरांसाठीही केला जातो असं सांगताना, “असाच प्रकार त्यांनी हिंदूहृदयसम्राट म्हटल्याने होत आहे,” असंही पावस्कर म्हणाले.

‘हिंदूहृदयसम्राट’ एक घोषणा होती…
त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंना पहिल्यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ असं संबोधण्यात आलं त्यावेळी ही केवळ एक पदवी नव्हती तर संपूर्ण घोषणा होती अशी आठवही पावस्कर यांनी करुन दिली. “तसं म्हणाल तर आजही मला आठवतंय हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधण्यात आलं तेव्हा एक गोष्ट वेगळी बोलण्यात आली होती. सत्तेसाठी सतराशे साठ आणि एकच हिंदूहृदयसम्राट! मग ते सत्तेसाठी सत्तेसाठी सतराशे साठ म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कसे काय बसले?” असा सवाल पावस्कर यांनी उद्धव ठाकरे गटाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य करताना केला. “त्यामुळे हिंदूहृदयसम्राट हा एवढाच पॅच नाहीय. त्या आगोदरही काहीतरी आहे. आणि ते तर अगोदरचं (वाक्य गृहित धरायचं) असेल तर त्याचा (त्या भूमिकेचा) विचार पण करायला हवा,” असंही पावस्कर यांनी म्हटलं आहे.

फडणवीस हिंदूत्वासाठी १६ ते १८ तास काम करतात
नितेश राणेंचा थेट उल्लेख करत फडणवीस हे हिंदूत्वासाठी १६ ते १८ तास काम करतात असा संदर्भतही शिंदे गटाचे प्रवक्ते असणार्या पावस्कर यांनी दिला. “त्यांनी (नितेश राणेंनी) जे म्हटलंय की हिंदूत्वासाठी काम करणारा नेता. हिंदूत्वासाठी जर १६ ते १८ तास आमचे देवेंद्र फडणवीस साहेब काम करत असतील, त्यांनी आता सणांसाठी केलेल्या योजना या सार्वांचा विचार करुन आमदार नितेश राणे यांनी त्यांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटलं असेल,” असं म्हणत शिंदे गटाची भूमिका पावस्कर यांनी स्पष्ट केली.

बाळासाहेबांची ‘हिंदूहृदयसम्राट’ ही पदवी…
“पण त्यांना (फडणवीस यांना) ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटल्याने बाळासाहेबांची ‘हिंदूहृदयसम्राट’ ही पदवी कोणी काढून घेतलेली नाही. बाळासाहेब आजही ‘हिंदूहृदयसम्राट’च आहेत. पण त्यांच्याबाबतीत असं कोणीही म्हणणार नाही. त्यांना उस्फुर्तपणे वाटलं तर त्यांनी म्हटलंय,” असं म्हणत पावस्कर यांनी नितेश राणेंची बाजू घेतली.