निवडणुकांचे वेध लागले तसे राजकीय पक्षांसह नेते मंडळी सक्रिय झाली असून पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे, शिबिरांच्या माध्यमांतून राजकारणातील सक्रियता दिसून येत असतानाच सामान्य मतदार व कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी आतापासून नेते मंडळींनी वेगवेगळ्या क्लृप्त्या आखायला सुरुवात केली आहे. सोलापुरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समर्थकांनी पुढाकार घेऊन मतदारांना देवदर्शनासाठी तीर्थयात्रा घडविण्याचा उपक्रम धूमधडाक्यात सुरू केला आहे. अष्टविनायक, तिरुपती बालाजी, अजमेर आदी ठिकाणच्या तीर्थयात्रा घडविताना स्वार्थ-परमार्थ साधण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो.

राज्यात आपल्या मतदारसंघातील वयोवृद्ध मतदार मंडळींना तीर्थयात्रा घडविण्याच्या उपक्रमामुळे पुण्यातील मनसेचे दिवंगत माजी आमदार ‘गोल्डन मॅन’ रमेश वांजळे हे सर्वप्रथम प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सोलापूर जिल्ह्य़ातही मतदारांना तीर्थयात्रा घडविण्याचा लोकप्रतिनिधींचा उपक्रम नवीन नाही. माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हणमंत डोळस, पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके आदी लोकप्रतिनिधींकडून दरवर्षी मतदारांना तीर्थयात्रा घडविण्याची सेवा सुरू असते. सोलापुरात अलीकडे ही ‘सेवा’ अधिक ‘गतिमान’ झाली आहे. त्याला आगामी निवडणुकांची पाश्र्वभूमी असल्याचे मानले जाते.

सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी सलग तीन वेळा निवडून गेले आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून त्याशिवाय सोलापूरचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सत्तेचा उपयोग स्वत:चे राजकीय स्थान अधिक भक्कम होण्यासाठी देशमुख यांची वाटचाल चालल्याचे दिसून येत असतानाच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. त्यातून गठीत झालेल्या तीर्थयात्रा समितीच्या माध्यमातून देशमुख यांच्या मतदारसंघातील तब्बल ४५०० मतदारांना तीर्थयात्रा घडविण्याचा घाट घालण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात तीनशे मतदारांना अष्टविनायकाचे दर्शन घडविण्यात आले आहे.

ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात या उपक्रमाचा शुभारंभ होताना पालकमंत्री देशमुख हे स्वत: जातीने हजर होते. पाच आराम बसेसमधून मतदारांनी अष्टविनायकाचे दर्शन करून सोलापुरात परतल्यानंतर प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्रे वितरित करण्याच्या नावाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात देशमुख यांच्या प्रचाराची संधी साधण्यात आली.

पालकमंत्री देशमुख यांच्याप्रमाणेच सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांनीही मतदारांना तीर्थयात्रा घडविण्याचा उपक्रम हाती घेतला. यात ७१३ मतदार तथा कार्यकर्त्यांना अष्टविनायक दर्शन घडविण्यासाठी १३ आराम बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या मतदार व कार्यकर्त्यांना निरोप देण्यात आला. यापूर्वी दिलीपराव माने विचार मंचच्या वतीने मतदारांना तिरुपती बालाजीचे दर्शन घडविण्यात आले होते. त्यासाठी खास वातानुकूलित रेल्वे बोगी तैनात करण्यात आली होती. निवडणुकांचे वेध लागले असतानाच या तीर्थयात्रांचा राजकीय लाभ मिळण्याचे गणित घालूनच असे उपक्रम राबविले जातात, ही बाब आता लपून राहिली नाही.