|| मोहनीराज लहाडे

नगरची महापालिका स्थापन होऊन पंधरा वर्षांचा कालावधी लोटला, मात्र कोणत्याही निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नाही. प्रत्येक वेळी एकमेकांचा आधार घेत, प्रसंगी सर्वपक्षीय बंडखोरांना बरोबर घेत महापालिकेत सत्ता स्थापन झालेल्या आहेत. सरत्या काळातही राष्ट्रवादी व शिवसेनेने हाच प्रयोग करत सत्ता मिळवली. आताही महापालिकेची वाटचाल त्याच दिशेने आहे. भाजपने सत्तेचा पुरेपूर वापर करीत मंत्र्यांची फौज प्रचारासाठी नगरमध्ये धाडली, स्वत: मुख्यमंत्र्यांची सभाही उद्या, शुक्रवारी समारोपप्रसंगी होत आहे. मात्र पक्षात शहरातील नेतृत्वावरून अंतर्गत आणि उमेदवारी वाटपावरून प्रचंड असंतोष आहे. तो मतदारांपर्यंत पाझरणे पक्षाला धोकादायक ठरणारा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जणू या निवडणुकीकडे दुर्लक्षच केले आहे.

प्रचारातून मात्र विकासाचे मुद्दे हरवले आहेत. भावनिक मुद्दे, वैयक्तिक हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप याला महत्त्व दिले जात आहे. उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्रोत नसलेल्या, तिजोरीत सातत्याने खडखडाट आहे. सर्वच पक्षांनी आजवर मनपावर आलटून पालटून सत्ता मिळवली. महापौरपद मिळाले नसले तरी भाजपही टेकू देण्यासाठी सत्तेत सहभागी झालेला आहेच. मात्र आजवर कोणतेच ठोस काम शहरात उभे राहू शकलेले नाही. ठेकेदार, पुरवठादार, कर्मचारी यांची विविध प्रकारची देणी ८० कोटींवर व मालमत्ता कराच्या वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी सुमारे २०० कोटी असे सुमारे ३०० कोटींचे आर्थिक असंतुलन मनपामध्ये निर्माण झालेले आहे. स्वहिस्सा भरण्याचीही ऐपत नसलेल्या मनपाला योजना राबवण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवाव्या लागल्या आहेत. व्यापारी संकुलासाठी भाजी मंडई पाडल्या, क्रीडांगणे हटवली ती पुन्हा उभारणे काही जमले नाही.

आगामी लोकसभा व विधानसभेपूर्वी होणारी ही निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणूनही जिल्ह्य़ातील राजकीय पक्ष व त्यांतील नेते नगर मनपाच्या निवडणुकीकडे पहात आहेत. लोकसभेसाठी काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे इच्छुक आहेत, म्हणूनच तयारीसाठी पक्षाने मनपा निवडणुकीसाठी सूत्रे त्यांच्याकडे सोपवली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना युवकचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात झालेल्या तडजोडीतून थोरात यांनीही डॉ. विखे यांच्या पुढाकाराला हरकत घेतलेली नाही. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनाही पुन्हा आपल्या उमेदवारीसाठी, विविध कारणांनी डळमळीत झालेले स्थान भक्कम करायचे आहे, शिवाय त्यांना चिरंजीव सुवेंद्र यांचीही वाटचाल मनपातून सुकर करायची आहे. प्रस्तावित कारवाई टाळण्यासाठी आ. शिवाजी कर्डिले यांनीही पक्षाला सोयरिकीच्या माध्यमातून उमेदवार आयात करून दिल्याचे उघडपणे बोलले जात आहे. पक्षाच्या कोअर कमिटीऐवजी निवडणुकीची सूत्रे खा. गांधी यांच्याकडे एकवटल्याचा परिणामही दिसतो आहे. राष्ट्रवादीचे निवडणुकीसाठीचे नेतृत्व अरुण जगताप व संग्राम जगताप या आमदार पितापुत्रांकडे आहे. आ. अरुण जगताप यांचे नाव राष्ट्रवादीने लोकसभेसाठी पुढे केले आहे तर शहरातील विधानसभेसाठी आ. संग्राम यांच्यासाठी मनपाची निवडणूक महत्त्वाची वाटते. त्यांच्या पत्नीही उमेदवार आहेत. शहरात शिवसेनेकडे पर्यायी नेतृत्वच उभे राहू शकलेले नाही. पक्षाचे माजी आमदार अनिल राठोड यांना त्यामुळेच मनपातील सत्तेची साथ हवी आहे. सेनेने लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून आलेले श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे मनपाच्या प्रत्येक प्रचार सभेत ते हजेरी लावत आहेत.

भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोर

सर्वाधिक बंडखोरी झालेली आहे ती भाजपमध्येच. जुने व निष्ठावंत डावलले गेल्याचा हा परिणाम. पक्षाच्या यादीत बहुसंख्य आयात उमेदवारांचा भरणा आहे. पक्षाने सात बंडखोर उमेदवारांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली, त्याबद्दल आणि आयात केलेल्या उमेदवारांच्या फलकांवर खुनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांसमवेत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा झळकत आहेत, त्यातून पक्षनेतृत्वाविषयी कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याचा फटका किती जागांवर बसणार याचीही चर्चा होत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतूनही बंडखोरी आहेच, मात्र पक्षाने अद्याप अशी कारवाई केलेली नाही.

राज्यातील सत्तेत भाजप व शिवसेना यांच्यामध्ये कधी युतीची तर कधी शत्रुत्वाची भावना असते. नगरमध्ये सेनेची तशीच भूमिका भाजपमधील गांधी गटाशी कायम शत्रुत्वाची व आगरकर गटाशी युतीची आहे. त्याचे परिणाम वेळोवेळीच्या निवडणुकीतुन दिसतात. लढत प्रमुख्याने भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी तिहेरी आहे. त्यातही प्रथम क्रमांकासाठी चढाओढ आहे ती भाजप व सेनेतच. सरत्या काळात राष्ट्रवादीचे संख्याबळ सर्वाधिक होते. काँग्रेस मात्र अस्तित्वासाठी झगडत आहे. मनसेचे चार नगरसेवक चार वेगवेगळ्या पक्षात विखुरले. राष्ट्रवादी-काँग्रेस-भाकप-युनायटेड रिपब्लिकन पक्ष यांची आघाडी झाली आहे.

सर्वाधिक अपक्ष

१७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यातील अपक्षांची संख्या १०६ आहे. अपक्ष व बंडोखोरी ही राजकीय पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे. महापालिकेच्या सत्तेत सुरुवातीचा अपवाद वगळता अपक्षांनी नेहमीच वरचढ भूमिका बजावली आहे, राजकीय पक्षांना आपल्या मर्जीप्रमाणे झुकवले आहे. भाजपने सर्वाधिक ६६ जागांवर (आठवले गटाच्या एका जागेसह) उमेदवार रिंगणात उतरवले आहेत व एका जागेवरील अर्ज बाद झाल्याने तेथे रासपला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने ६०, आघाडीत राष्ट्रवादीने ४४ (त्यातील ३ युनायटेड रिपब्लिकन पक्षाला) व काँग्रेसला २२ जागा मिळूनही केवळ १७ जागांवर उमेदवार लाभले आहेत. तीन जागांवर भाकप, मनसे १४, बसपा ९, सपा ३, रासप ४ जागेवर पक्षचिन्हासह आहे.