फावडे, टिकाव आणि टोपले जागेवरच टाकून दोन हजार कर्मचाऱ्यांची तात्काळ घरवापसी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेने ‘महाश्रमदाना’चा अचानक तोंडी फतवा काढला. सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी श्रमदानासाठी दाखलही झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठ फिरताच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी ‘महाश्रमदाना’चा एकसाथ समारोप केला. डोंगरावर पडलेले फावडे, टिकाव आणि टोपले उचलण्याची तसदीदेखील त्यांनी घेतली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हीआयपी व धावता दौरा भूम तालुक्यातील ग्रामस्थांनी अनुभवला. हिवरा येथे गतवर्षी झालेल्या जलयुक्त शिवाराची कामे पाहण्यासाठी मुख्यमंत्री दाखल झाले. ज्या ठिकाणी पाहणी झाली, तेथून शंभर मीटर अंतरावर महाश्रमदानासाठी एक डोंगर हेरून ठेवण्ला होता. शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना महाश्रमदानाचे तोंडी आदेश देण्यात आले. त्यामुळे सुटीच्या दिवशी साहेबांनी दिलेला आदेश पाळण्यासाठी आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, पाटबंधारे, बांधकाम अशा सर्व विभागातील सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी धावत पळत महाश्रमदानासाठी दाखल झाले होते. या कामी शिक्षण विभागाने काही खासगी शाळांच्या स्कूलबस दिमतीला दिल्या होत्या. हिवरा येथील ग्रामस्थांनी मागील महिनाभरापासून वॉटर कप स्पध्रेकरिता पाणी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मोठे काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे ढुंकूनही न पाहता कृषी विभागाने गतवर्षी केलेल्या कामाला ‘पावर पॉईंट प्रेझेंटेशन’लाच मार्क दिले. त्यामुळे महिनाभरापासून गावात श्रमदानाची चळवळ निर्माण करणाऱ्या ग्रामस्थांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी श्रमदान करणे अपेक्षित नाही. त्या ऐवजी त्यांनी रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवारमधील कामांना मंजुरी देणे गरजेचे आहे. वर्षभरात एकाही कामाला मंजुरी न देता सुरू केलेला महाश्रमदानाचा फार्स हा केवळ दिखाव्यापुरता असल्याची प्रतिक्रिया पाणी फाउंडेशनचे कार्यकत्रे इरफान शेख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.  गतवर्षी जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करून फडणवीस यांची गाडी पाच मिनिटात भूमच्या दिशेने निघून गेली आणि अवघ्या काही क्षणात महाश्रमदानासाठी आलेला कर्मचाऱ्यांचा जथ्था लगेच पांगला.

आंदोलक युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार

हिवरा गावात दाखल होण्यापूर्वी पारडी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेततळ्याचे पूजन करण्यात आले. येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे निघाला असता, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. कर्जमाफी मिळाली पाहिजे, मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या दानवेंवर कारवाई करा, अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. आंदोलनकर्त्यां उमेश राजेिनबाळकर, रोहित थिटे, प्रभाकर डेंबाळे, अवधुत क्षीरसागर आणि रोहन जाधव यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीतही मारहाण केली. दरम्यान दानवेंच्या वक्तव्यावरील प्रश्नावरी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचे टाळले.