संगमनेरहून गुलबग्र्याकडे गोमांस घेऊन निघालेली मोटार अिहसा संघाच्या कार्यकर्त्यांनी राहुरीनजीक पोलिसांना पकडून दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केल्यानंतर नगर जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
संगमनेर येथून गुलबर्गा (कर्नाटक) येथे एमएच ०६ एजी ३४३१ या क्रमांकाच्या पिकअप व्हॅनमधून मांस चालले होते. त्याची माहिती अिहसा संघाच्या निफाड (जि. नाशिक) येथील कार्यकर्त्यांना मिळाली. संघाचे कार्यकर्ते विकास नवनाथ गुंजाळ यांनी मोटारीचा पाठलाग सुरु केला. राहुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी नाकेबंदी करुन ही व्हॅन ताब्यात घेतली. विकास गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आयुब मेहबूब कुरेशी (रा. इस्लामपूर, संगमनेर) याच्याविरुध्द गोहत्याबंदी कायदा व प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याच्यासोबत असलेला मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी अभिरक्षण गृहात करण्यात आली. शनिवारी रामनवमी असल्याने पोलिसांनी अंत्यंत गोपनीयतेने हे प्रकरण हाताळले.