|| सुहास बिऱ्हाडे

वसई-विरार महापालिकेचा पूरपरिस्थितीवर तोडगा

वसई : शहरात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वसई-विरार महापालिका साचलेले पाणी विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जमिनीत मुरवणार आहे. यामुळे भूजल स्तर वाढेलच शिवाय शहरात पूरपरिस्थितीची समस्या दूर होईल. नालासोपाऱ्याच्या तुळींज येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविला जाणार आहे.  राज्यात अशा प्रकारचा प्रकल्प राबविणारी वसई-विरार ही पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन शहर जलमय होण्याची समस्या निर्माण होते. नियोजनाअभावी वाढत असलेल्या शहरीकरणामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साठत असते. २०१८ मध्ये तर वसई-विरार शहर पूरामुळे दहा दिवस ठप्प झाले होते. या पूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (निरी) समितीने  शहरातील पाणी साठण्याच्या ३० जागा शोधून काढल्या होत्या. दाटीवाटीने असलेल्या इमारती आणि पाणी जाण्याचे मार्ग बंद झालेल्या या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठत असते. ही समस्या सोडविण्यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉण्डस) तयार करावेत, अशा सूचना निरी समितीने सुचविल्या होत्या. मात्र शहरात धारण तलाव करणे शक्य नसल्याने पालिकेने इतर पर्यायांचा विचार सुरू केला होता. त्याचा शोध सुरू असताना पाालिकेने पावसाचे पाणी जमिनीतच साठवून या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी या विषयावर काम करणाऱ्या वॉटर फिल्ड रिसर्च फाउंडेशन या संस्थेने नंदुरबार, नाशिक या ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये नैसर्गिकरित्या पाणी जमिनीत साठवण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या केला होता. त्याचाच आधार घेऊन पावसात शहरात साचलेले पाणी जमिनीतच मुरवले तर पुराच्या पाण्याची समस्या दूर होईल आणि जमिनीची भूजल पातळी वाढू शकेल असा विचार पालिकेने केला. हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन पालिकेने संस्थेच्या वॉटरफिल्ड टेक्नॉलॉजी या कंपनीला हे काम दिले आहे. त्यांनी नालासोपारा पूर्वेच्या तुळींज येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. अशा प्रकारे पूरपरिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पाणी जमिनीतच साठवणारी वसई विरार ही पहिली महापालिका ठरणार आहे.

पाणी साठवणुकीची पद्धत

पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नालासोपाऱ्याच्या तुळींज येथे ३० ठिकाणी पाणी शोषून घेणाऱ्या विहिरी (इंटेक वेल) बांधल्या जाणार आहेत. पावसाळ्यात पुराचे पाणी साचल्यावर या विहिरी पाणी खेचून घेतील. हे पाणी मग इंजेक्शनच्या आकाराच्या बोअरवेलमधून जमिनीत २०० फुटांपर्यंत खाली मुरवले जाईल. या ठिकाणी जमिनीखाली असलेल्या दगडांच्या नैसर्गिक भेगांमधून पाणी जमिनीत मुरवले जाईल. या बोअरवेलची रचना इंजेक्शनच्या आकाराची आहे. त्याची क्षमता दिवसाला ५० हजार लिटर पाणी शोषून घेण्याची आहे. यामुळे पाण्याचा निचरा तर होईलच शिवाय भूजल स्तरदेखील वाढणार आहे. हे पाणी आपत्कालीन परिस्थितीत वापरता येऊ  शकणार आहे. हा पूर्ण प्रकल्प नैसर्गिक आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरवले जाणार आहे.  सध्या या प्रकल्पाला सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत: नैसर्गिक असून त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट दूर होईल, अशी माहिती वॉटरफिल्ड टेक्नॉलॉजी या कंपनीचे संचालक संदीप अध्यापक यांनी दिली.

पाणी जमिनित मुरवले जाणार असल्याने भूजल स्तरदेखील वाढणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात येत असून लवकरच शहराच्या अन्य भागात देखील तो राबवला जाणार आहे – गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका

साचलेले पाणी विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जमिनीत मुरवण्याचा हा प्रकल्प म्हणजे पाण्याची बँक तयार करणे आहे. प्रकल्पामुळे कमी खर्चात पूर्णपणे नैसर्गिकरित्या पाणी जमिनीत साठवले जाणार  आहे. – संदीप अध्यापक, संचालक वॉटरफिल्ड टेक्नॉलॉजी