येथूनच जवळच असलेल्या मनमाड-नांदगाव रस्त्यावरील पानेवाडी इंधन कंपन्यांच्या परिसरात गुरूवारी दुपारी अचानक धोक्याचे सायरन वाजू लागले आणि नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. तेल कंपन्यांच्या परिसरातील टँकर तात्काळ बाहेर नेण्यात आले. अग्नीशमन दलासह सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या, आग. आग. असे आवाज ऐकून परिसरात खळबळ उडाली. पाण्याचे उंच फवारे उडताना दिसले. अवघ्या काही वेळात हे वातावरण शांत झाले. तेल कंपनी परिसरात लागलेली आग तात्काळ आटोक्यात आल्याचा निर्वाळा सुरक्षा यंत्रणांनी दिला आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही प्रत्यक्षात लागलेली आग नव्हती, तर ती प्रात्यक्षिकांसाठी लावण्यात आलेली आग होती.

अतिज्वलनशील पदार्थांची साठवणूक होत असलेल्या कंपन्यांमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. वर्षांतून दोनवेळा अशा प्रकल्पात अचानकपणे सुरक्षेची प्रात्यक्षिके घेतली जातात. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम टर्मिनल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी येथे गुरूवारी दुपारी स्वतंत्रपणे आग सुरक्षा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व शासकीय अधिकारी, संबंधित जिल्हा यंत्रणाचे प्रमुख तहसीलदार, नगराध्यक्ष, कंपनीचे अधिकारी, पोलिस प्रशासन, नगरपालिका अग्नीशमन दल व नाशिक येथील विविध औद्योगिक कंपन्याचे सुरक्षा प्रतिनिधी व सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

पानेवाडीस्थित भारत पेट्रोलियम कंपनीत टाकी क्रमांक ००२ सी जवळ इंधन गळती होऊन आग लागली. या टाकीलगत धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी सर्व यंत्रणेला सक्रिय केले. कंपनीची स्वयंचलित यंत्रणा आणि टँकरमध्ये इंधन भरण्याची प्रक्रिया त्याचक्षणी थांबविण्यात आली. धोक्याचे सायरन वाजू लागले. कंपन्यातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षापथक, यातायात पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठय़ा क्षमतेची ही टाकी असल्याने सुरक्षा यंत्रणानी जीव धोक्यात घालून दोन्ही बाजुने पाणी आणि अती उच्च क्षमतेचे फवारे सोडले. तात्काळ कारवाईमुळे अवघ्या १४ मिनिटांत आग आटोक्यात आली. सुरक्षा यंत्रणेने घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी सुरक्षा यंत्रणेने आग कशी लागली व कशी विझवली याचे स्पष्टीकरण दिले.

याच स्वरुपाची प्रात्यक्षिके हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीत झाली. एका टाकीजवळ आग लागल्याने धोक्याचा इशारा देणारे सायरन वाजले. त्याच क्षणी कंपनीची सर्व यंत्रणा थांबविण्यात आली. इंधन भरण्यासाठी आलेले टँकर बाहेर काढण्यात आले. पाण्याचे फवारे मारून आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणा किती तत्परतेने काम करू शकते याचा आढावा घेण्यात आला.