मातृमंदिर संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना

रत्नागिरी : कोकणात आरोग्यविषयक सुविधांची वानवा असल्याचे लक्षात घेऊन संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे अत्याधुनिक सुविधांयुक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मातृमंदिर संस्थेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यास आर्थिक पाठबळाची गरज आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरपासून जेमतेम १५ किलोमीटर अंतरावर या संस्थेतर्फे गेली सुमारे ६५ वर्षे आरोग्यसेवा सुरू आहे. काळाच्या ओघात तेथे वैद्यकीय सुविधा बऱ्यापैकी निर्माण केलेल्या असल्या तरी भविष्यातील गरजा लक्षात घेता अजूनही गुणात्मक वाढीला भरपूर वाव आहे. करोनासारख्या संकटाचा सामना करताना ही गरज राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाली आहे. कोकणासारख्या मागास प्रदेशात आणि रत्नागिरीसारख्या दुर्गम डोंगराळ जिल्ह्यात ही उणीव आणखी तीव्रपणे लक्षात येते. त्यामुळे मातृमंदिर संस्थेने हा संकल्प केला आहे.

देवरुख हे तालुक्याचे ठिकाण असून सह्याद्रीच्या खोऱ्यातील सुमारे शंभर गावे या शहराशी जोडलेली आहेत. शिवाय दोन महामार्ग या शहराच्या जवळून जातात. त्यामुळे वाहतुकीची सुविधा आहे, पण त्याचबरोबर मोठ्या अपघाताच्या शक्यता लक्षात घेता ट्रॉमा केअर सेंटर, ब्लड बँकेसारख्या आधुनिक सुविधांचीही आवश्यकता आहे. मातृमंदिर ही गरज भागवू शकते. संस्थेकडे  स्वत:च्या मालकीची सुमारे ४० एकर जागा असल्याने विस्ताराला भरपूर वाव आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, येथील दुर्गम भागात वैद्यकीय सेवेचा सहा दशकांहून जास्त अनुभव आहे.

सध्या या संस्थेकडे वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांसाठी आवश्यक यंत्रसामग्री असली तरी त्यामध्ये आणखी आधुनिकीकरणाची गरज आहे. जिल्ह्यातील करोना उद्रेकाच्या काळात संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या उपचार केंद्राच्या माध्यमातून त्या दृष्टीने काही पावले उचलण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या वतीने संस्थेला सुमारे ९० लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्लान्ट मंजूर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त देश-परदेशातील काही हितचिंतकांनीही आर्थिक साहाय्याची तयारी दर्शवली आहे. पण प्रकल्पाचे भव्य स्वरूप लक्षात घेता निधीची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे.

या आरोग्य प्रकल्पाव्यतिरिक्त संस्थेच्या ‘गोकुळ’ या अनाथालयात असलेल्या मुलींना वयाच्या १८ वर्षांनंतर येथे ठेवता येत नाही. खरे तर त्यापुढील काळातही काही वर्षे या मुलींना साहाय्याची गरज असते. त्या दृष्टीने या वयोगटासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्याची संस्थेची योजना आहे.