पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड आणि त्याच्या १८ भागीदार कंपन्यांमध्ये भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निकटच्या नातेवाईकांचे शेअर असल्याचे उघडकीस आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ तत्त्वचिंतक व चार्टर्ड अकाऊंटंट एस. गुरुमूर्ती यांनी काही दिवसांपूर्वीच गडकरींना पूर्तीबाबत ‘क्लीन चिट’ दिली होती, परंतु पूर्तीच्या या भागीदार कंपन्यांमध्ये गडकरी कुटुंबाशी निकटचे संबंध असलेल्या व्यक्तींचे शेअर असल्याचे पूर्तीने कंपनी निबंधकाकडे सादर केलेल्या वार्षिक कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
नितीन गडकरी यांची पत्नी कांचन, मुलगे निखिल व सारंग आणि भाचा संदीप भुरचंडी यांचे पूर्तीच्या तीन भागीदार कंपन्यां जसिका र्मकटाईल, जयनाम र्मकटाईल आणि नीलय र्मकटाईल यात २००९-१० पासून शेअर्स आहेत. पूर्तीचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा आणि गडकरींचा वाहनचालक मनोहर पानसे यांचीही यात अंशधारक म्हणून नावे आहेत. उपलब्ध कागदपत्रांनुसार सर्वजण अंशधारक तसेच संचालक म्हणून कार्यरत आहेत. याचाच अर्थ गडकरींचे निकटस्थ पूर्ती आणि महात्मा शुगर अँड पॉवर लिमिटेड तसेच गडकरींनी उभारलेल्या कंपनीत मोठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये नियंत्रण ठेवून आहेत. वादग्रस्त व्यावसायिक मनीष मेहता यांचे नाव मात्र यात या वेळी आलेले नाही. गडकरी-मेहता कनेक्शन २००० पासूनचे आहे. दोघेही पूर्तीमध्ये स्थापनेपासून संचालक म्हणून सक्रिय होते. त्यानंतर त्यांची चिंतामणी अ‍ॅग्रोटेक आणि उमरेड अ‍ॅग्रो कॉम्प्लेक्सवर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
१० एप्रिल २०१० ते २७ ऑगस्ट २०११ दरम्यान नितीन गडकरी पूर्तीचे अध्यक्ष व संचालक होते. गडकरींनी गेल्या वर्षी सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांचे सद्यस्थितीत फक्त ३१० शेअर्स आहेत. संदीप भुरचंडी हा गडकरींच्या मोठय़ा बहिणीचा मुलगा आहे. त्याच्या घरच्या पत्त्यावर बुलढाणा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा रजिस्टर्ड पत्ता दाखविण्यात आला आहे. गडकरींचा पूर्ती किंवा भागीदार कंपन्यांशी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध नसल्याची ‘क्लीन चिट’ गुरुमूर्ती यांनी दिली असली तरी या नव्या कागदपत्रांवरून गडकरी कुटुंबाचा असलेला संबंध स्पष्ट झाल्याने गडकरींपुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. राम जेठमलानी, महेश जेठमलानी पिता-पुत्राने गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर भाजपातील गडकरी विरोधाची धार तीव्र होऊ लागली आहे. राजीनाम्याच्या मागणीत ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांनीही सुरात सूर मिसळला आहे.