गणेशोत्सवाच्या उत्साही पर्वाचा समारोप रविवारी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने झाला. अमरावती शहरात छत्री तलाव, प्रथमेश तलाव, कोंडेश्वर तलावावर भक्तांनी गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी गर्दी केली होती. जिल्ह्य़ातही सर्वत्र शांततेत विसर्जन पार पडले.
या जिल्ह्य़ात सोळाशेवर सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ग्रामीण भागात पेढी, वर्धा, चंद्रभागा, पूर्णा अशा विविध नद्यांच्या काठांवर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन येत्या एक-दोन दिवसांमध्ये होणार असून आज सर्वाधिक विसर्जन मिरवणुकी निघाल्या. अमरावतीतील छत्री तलावाचे प्रदूषण होऊ नये, यासाठी गेल्या काही वर्षांपासून तलावाच्या काठावरच मोठे खड्डे खोदून कृत्रिम तलाव तयार केले जातात.
यंदाही दोन मोठय़ा तलावांमध्ये गणेशभक्तांनी मूर्तीचे विसर्जन केले. मोठय़ा मूर्तीसाठी स्वतंत्र तळे तयार करण्यात आले होते. वडाळी परिसरातील प्रथमेश तलावावरही गणेशमूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. अपघात टाळण्यासाठी तलावाच्या बाजूंना कठडे बसवण्यात आले होते.