सावंतवाडी  : दुसऱ्या महायुद्धानंतर जगात आर्थिक घडी बिघाड झाल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.

सावंतवाडी राजवाडा येथे महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तेथे आले असता जागतिक पातळीवर मंदी येण्याची शक्यता असून भारताने काय पावले उचलली आहेत असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता त्यावेळी सुरेश प्रभू बोलत होते. यावेळी युवराज लखमराजे भोसले, अँड नकुल पार्सेकर उपस्थित होते.

सुरेश प्रभू म्हणाले, जागतिक पातळीवर आयात-निर्यात वाढत जाते. त्यावेळी आर्थिक प्रगती होते. आर्थिक व्यापार कमी व्हायला लागला की अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. युक्रेन युद्धामुळे  ऊर्जेवर परिणाम होईल. त्यामुळे अर्थव्यवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. दुष्काळात तेरावा महिना प्रमाणे युरोप अमेरिकेमध्ये थंडी सुरू झाल्यानंतर विजेची मागणी वाढेल.विजेची मागणी वाढेल आणि पुरवठा कमी होईल. ऊर्जेची किंमत वाढल्यानंतर प्रोडक्शन कमी होईल, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

सुरेश प्रभू म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर आता अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे ऊर्जा निर्मितीवर परिणाम होईल. पुढील काळात मानव जगणार की नाही असा परिणाम करणारी अर्थव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. जगावर पर्यावरणीय बदलामुळे हवामानाचा देखील परिणाम होत आहे. जगातील अनेक देशातील नद्या ह्या कोरडय़ा पडत आहेत. पर्यावरणीय बदल जगाची गंभीर परिस्थिती निर्माण करणारा ठरेल. जगाची परिस्थिती ही आयसीयूमध्ये असल्यासारखी होण्याची शक्यता आहे.

प्रभू म्हणाले, जैवविविधता, नद्या हे फारच महत्त्वाचे आहे. पश्चिम घाट आणि इंस्टंट घाट जागतिक पातळीवर पर्यावरण रक्षण करणारे होते. दोन्ही ठिकाणी परिणाम झाला तर हवामान बदलाची मोठी शक्यता आहे. समुद्रात मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आहे, ती नष्ट होण्याची भीती आहे. तसे झाले तर माशापेक्षा प्लास्टिकच वाढेल. देशाला पर्यावरणीय बदलाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे पश्चिम घाट, इंस्टंट घाटातील जैवविविधतेचे संरक्षणाची गरज आहे. जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे.