|| छाया महाजन

आपल्या मनाची गंमत असते. भविष्यकाळाबद्दल खात्रीपूर्वक निश्चितपणे काही सांगू शकत नसतानाही, वर्तमानात जगत असताना आपले डोळे भविष्याकडे लागलेले असतात, कारण उद्या काय हा प्रश्न वेडय़ासारखा वाटावा अशी स्थिती दुसऱ्या क्षणी काय असेल, याबद्दलची अनभिज्ञता आहे. त्यामुळे वर्तमानात लक्ष आणि लक्ष्य भविष्यावर आणि मन मात्र भूतकाळाकडे ओढ घेणारं आणि भूतकाळात रमणारं. खात्रीशीर भूतकाळच आहे. कारण तो आपण अनुभवलेला असतो.

घटना घडताना, अनुभवताना त्या कधी कधी अत्यंत कटू, मनाविरुद्ध आणि तिरस्करणीय असतील पण त्यातलेच काही अनुभव एकदम ‘मेमोरेबल’ होऊन जातात. विशेषत: आयुष्यात पुढे यश किंवा ऐश्वर्य संपन्नता आली, तर आधीचे संघर्ष, परिश्रम हे परिकथेसारखे बदलून आवर्जून कथित करण्यासारखे वाटू लागतात. सिंड्रेलाला बूट मिळेपर्यंतच्या छळासारखे, रुपेरी कडेचे ढग, मग यशाची रुपेरीकड अशा काळ्या ढगांनी जास्त झळाळते.

अर्थात, भूतकाळात रमण्याची वृत्ती सगळ्यांची नसते. काहींमध्ये ती असते. काही लोक नादावल्यासारखे आपल्या काळाबद्दल बोलतात. त्यांना आठवणी जपाव्याशा वाटतात किंवा जपण्याचा छंद असतो. बहुतांशी लोक भविष्यकाळाची स्वप्नं पाहतात. आपल्या आकांक्षांना मूर्त रूप देण्यासाठी वर्तमानात प्रयत्नशील होतात. पाहिजे ते मिळवण्यासाठी धडपडतात. कष्ट करतात. त्यात त्यांना वर्तमानकाळही पूर्णपणे समरसून जगता येत नाही. त्यांना जागं करून ‘आयुष्य एकदाच येतं आणि त्यातलं तारुण्य ही एकदाच उपभोगता येतं. एकदा गेलं की पुन्हा मागूनही मिळत नाही’ अशा प्रकारच्या कविता आणि गाणी ‘आजचा क्षण आजच जगून घ्या’ किंवा दु:खं आजपुरतंच आहे असेही सांगणारी गाणी गातात.पण ‘गोइंग डाउन द मेमरी लेन’ आठवणींच्या रस्त्यावर रमलेल्या माणसांना अशा सल्ल्याची गरज नाही.

असं जरी असलं तरी असं दिसतं की बहुतेकांना आपलं लहानपण आठवत राहतं ते रम्य असल्याचं त्यांना ठामपणे वाटतं. तेव्हाची आजूबाजूची माणसं, नाती फार मोलाची वाटतात. म्हणून जगजितसिंगची ‘मगर मुझसे लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी’ सारखी गजल इतकी मनाला भिडते.

तसंच आपल्या सणावाराचं आहे. अनेक सण, उत्सव, जत्रा, उरूस हे सामूहिकपणे साजरे करायचे असतात. नवरात्र, गणपती उत्सव हे लोकाभिमुख सामाजिक सण झालेत. दिवाळी मात्र अजून आपलं खासगीपण टिकवून आहे. हे सण ऋतूंसारखे नियमित येतात. आनंदाचं उत्साहाचं मोठं फुललेलं झाड घेऊन येतात.

दिवाळी येताना आनंदाचं पक्कं निमंत्रण घेऊन येते. अनेक सुखद आल्हाददायक आठवणी ठेवून जाते. ही साजरी होताना वयाचा, आíथक क्षमतेच्या किंवा जातीच्या उतरंडीचा भाग बाजूला पडतो. कारण ती एकटी येत नाही तर ती बरोबर लक्ष्मी आणते आणि प्रत्यक्ष आणली नाही तर समृद्धीची कल्पना व आशा तर आणतेच आणते. तशी कौटुंबिक नातीही आणते. प्रत्यक्ष भेटी होतात. तशा भेटकार्ड आणि एसएमएसद्वारे अप्रत्यक्ष भेटीची इच्छाही सूचित होते. कविता आणि संदेशाची एवढी प्रचंड उलाढाल ही व्यापाराइतकीच मोठी होते.

तिच्या सोबत येतात आधीच्या दिवाळीच्या आठवणी, विशेषत: लहाणपणीच्या हातात फटाका किंवा बॉम्ब फुटल्याची आठवण, फुलझडीच्या विझलेल्या तारेच्या चटक्याची  किंवा सोडलेले रॉकेट नेमके शेजाऱ्यांच्या घरात घुसल्याच्या अनेक आठवणी. आठवतात ती पिवळ्याधमक किंवा नारंगी झेंडूच्या फुलांची तोरणं, अंगणभर पसरलेल्या रंगानं मढवलेल्या रांगोळ्या. शेणानं सारवलेलं ओलं अंगण आणि उंबरठय़ाशी रंगीत रांगोळीनं केलेलं इंद्रधनुषी स्वागत. रांगोळीवर तेवणारी पणती. पाडव्याच्या सकाळी ओसरीला येऊन वाजणारा चौघडा किंवा वाजणारी शहनाई आणि दारं, खिडक्या, कोनाडे आणि अंगणात तेलाने चिकट करणाऱ्या असंख्य तेवत्या पणत्या.

घरावर, गॅलरीत प्रकाशित आकाशदिवा हे तर खास आकर्षण कारण स्वहस्ते बनवला जाणारा आकाशकंदील ही केवढा तरी अभिमानाची गोष्ट आणि ती तयार करणं म्हणजे एखादा प्रकल्प हाती घेतल्याचा उत्साह. जिलेटिनचे रंगीत कागद, कामटय़ा, दोऱ्या, डिंक, कात्र्यांसह त्यात बसलेला तज्ज्ञ, त्याच्याभोवती उत्सुक मुलांचा ताफा म्हणजे तत्पर स्वयंसेवकच. त्यामुळे आकाशदिवा करणाऱ्याला आपण नासातले शास्त्रज्ञ असल्यासारखं वाटल्यास नवल नाही. अशा वेळी मुलगा, मुलगी हा भेद नसे. मदत आणि उत्सुकता हाच क्रायटेरिया.

घर अक्षरश: गजबजलेले. काका-काकू, आत्या, मावशा, आजी-आजोबा आणि भावंडांचा तांडा. चुलत मामे, मावस, चुलत दूरचे-जवळचे इ.इ.इ असायचे. आणि विविध वयोगटाची मुलं. त्यांची वयानुसार वर्गवारी आपोआप व्हायची. त्यातही आवडती-नावडती भावंडं यांचे तट पडायचे. खेळणाऱ्यांचे आणि लिंबूटिंबू ठरवलेल्यात भांवंडही ठरलेली, खेळू न दिल्यामुळे त्यांची रडली पडली आणि मोठय़ांकडून बोलणी खाणंही नेहमीचा भाग होता. पण काम करवून घ्यायला लिंबूटिंबू हा उत्तम गट. यांची उपयुक्तता काम करवून घेणारेच जाणतात. आकाशदिवा नसेल तर दिव्यांच्या माळा सोडण्यातही आनंद पण तरी आकाशदिव्यांची शोभा वेगळीच. या वेळी समस्त स्त्रीवर्ग दिवाळीची घराची सफाई या कार्यक्रमापूर्वी ‘कर्टन रेजर’ असतो तशा कामात व्यस्त. काम वाढल्यामुळे खेकसणं रागवणंही सुरू. मग सामानाची यादी नंतर पाकसिद्धी आणि फराळ!

आठवणींच्या या पाश्र्वभूमीवर आजची दिवाळी म्हणजे फुललेला बाजार. गजबजलेले मॉल. भारतीय आणि विदेशी वस्तूंनी भरलेल्या शोरूम्स. तेव्हाचा ‘कापडं’ शिवणारा, गळ्यात टेप स्टेस्थोस्कोपसारखा ठेवणारा िशपी गायब झालाय. पणत्या, बोळकी, दीपावलीच्या पणत्याधारी मातीच्या बाहुल्या अंग चोरून कोपऱ्यात गेल्यात किंवा दोन दिवस आधी रस्त्याच्या कडेला एखाद्या दिवशी संसार थाटून बसताहेत आणि सकाळच्याला गायब होताहेत. कुंभार दिसत नाहीयेत. उलट असंख्य ‘महासेल’ लागतायेत किंवा एक्झिबिशन लागताहेत. त्यात पूर्वीसारख्या मातीच्या साध्या पणत्या आणि घरी रंगवलेल्या साध्याभोळ्या दीपलक्ष्म्या नाहीत तर विविध आकाराच्या रंगीत पणत्यासह अनेक वस्तू आहेत.

आज्यांनी वाती करण्याची गरज संपलीये. त्यामुळे कापसाच्या दोऱ्याला किती आणि कसा पिळ देत वात करण्याचे कसब लयाला गेलंय. लाडू, चिवडा, शेव, चकली, लवंगलतिका, खजुऱ्या, अनारसे असे अनेक पदार्थ पूर्ण वर्षभर उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवाळीला वेगळे काय करायचं किंवा खायचं? कारण तशी रोजच दिवाळी होऊ शकते. तेचं कपडय़ांचं. सणवारी नवा कपडा ही संकल्पना एकत्र कुटुंबाबरोबरच संपली. शिवाय कपडय़ांच्या नित्य नव्या फॅशन्स हा आणखी वेगळा भाग आहे. आकाशदिवे चीन, कोरिया, तवानहून येताहेत. कामटय़ा जिलेटीन जाऊन आकाशदिवे तयार करणारे आणि प्रौढी मिरवणारे कलाकार कलाहीन झालेत.

फ्लॅटच्या दारात आठ बाय आठ इंची चौकोनी फरशीवर रांगोळी आकसून सजतेय. तिचा रंग डोळ्यावर चढत नाहीये. चार दिवस धडाकून फुटणारे फटाके आणि दारू आता गल्लोगल्ली फक्त लक्ष्मीपूजनाला वाजताहेत. उरले दिवस फुटकळ दारू वाजते. फटाक्यांच्या वाढत्या भावानं फटाक्यांच्या लडीची लांबी कमी होतेय. काही काळात लक्ष्मी जेमतेम ऐकू शकेल एवढी ती लहान होईल. बाजारात व्यापारी गल्ल्यात पाडव्याला फटाके फुटतात. पण आता बाजारपेठही एखाद्या गल्लीपुरती मर्यादित नाही. जिथे पाहाल तिथे दुकाने आहेत. व्यापाऱ्याची खतावणीची वही पाडव्याला बदलणं हे मॉल संस्कृतीत पुजाऱ्याद्वारे करतात की नाही माहीत नाही. आजकाल पुजारी लागत नाही सीडीज् लावून पूजा होते. पौरोहित्यही पूर्वीसारखं नाही. पुरोहितांना फक्त सीडीज् स्पर्धक नाहीत तर स्त्रियाही स्पर्धक आहेत.

मिठाईची जागा कॅडबरी चॉकलेट घेऊ पाहते आहे. फराळाचे डबे घरातून न जाता परस्पर मिठायाच्या दुकानातून जातायेत. दिवाळी तीच आहे तरी पूर्वीच्या हॉटेलच्या नावाला किंवा दुकानाच्या नावाला न्यू लावून नाव देतात. उदाहरणार्थ न्यू साई हॉटेल, तसंही नवी आधुनिक दिवाळी. आता तर दिवाळीत गुलाबी थंडीही येणं बंद झालंय. पाऊस पुढं सरकून पणत्या लावणं अशक्य करतोय. सण साजरे करण्याची पद्धत बदलतेय. साजरं करणं हा रिवाजच आहे. लहानपणी आईनं भांग पाडणं हा रिवाज. वय वाढायला लागलं की मुलगा नाकारतो म्हणजे स्वत: क्रियाशील होऊन रिवाज बदलतो. तसं उत्सवी सणांचं होतयं. पण ते नुसतं पोकळ अवडंबर नसावं हे भान ठेवणं गरजेचं आहे.

एरवी कामासाठी आपण स्वार्थापोटी ‘प्रोफेशनल’ नाती जपतो ते थोडं बाजूला ठेवून मित्रांना, नात्यांना जोडून घेण्याची, कनेक्ट होण्याची हीच वेळ. कारण नाती नुसती नाती नसतात. ती अडगळीला टाकायची नसतात. त्यांना कुठल्याही कसोटय़ांवर सिद्ध करायचं नसतं. तर तुम्ही मला प्रिय आहात ही मनाजवळची भावना जाणवून द्यायची असते ती याच काळात.