सांगली : माझ्या बदनामीचे षडयंत्र नागपूरचे असून अशा प्रयत्नांना मी भीक घालणार नाही आणि प्रस्थापितांच्या विरोधातील संघर्ष सुरूच ठेवेन, असे पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी सांगितले. सांगली जिल्ह्य़ातील आरेवाडी येथे झालेल्या धनगर समाजाच्या जत्रा मेळाव्यात ते बोलत होते. आज गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दोन स्वतंत्र मेळावे झाले. या वेळी पटेल म्हणाले, की मी समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करीत असताना देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न नागपूर येथील काही मंडळी जाणीवपूर्वक करीत असून अशा प्रयत्नांना मी भीक घालत नाही. बहुजन समाजाच्या हक्कासाठी माझा संघर्ष चालूच राहील. या वेळी पडळकर म्हणाले, की धनगर समाजाला केवळ आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण नसून राजकीय आरक्षणही मिळणे गरजेचे आहे. यापुढील आपला लढा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी राहील. भाजपने फसवून सत्ता घेतली आहे. येत्या तीन महिन्यांत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले नाही, तर भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय बहुजन समाज स्वस्थ बसणार नाही. दरम्यान माजी आमदार शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या स्वतंत्र्य मेळाव्यात धनगर आरक्षणासाठी निकराचा लढा यापुढे सुरू राहील असे सांगण्यात आले. या व्यासपीठावर भाजपचे खासदार महात्मे, माजी मंत्री अण्णा डांगे आणि सर्व शेंडगे बंधू एकत्रित होते.