कर्तव्यावर असलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने स्वतःच लग्न पुढे ढकलून करोनाविरोधात अवध्या देशाच्या सुरू असलेल्या या युध्दात कर्तव्य बजावण्यास अधिक प्राधान्य दिल्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण सर्वासमोर ठेवले आहे. बालाजी लहू घुगे हे मुळचे तुळजापुर तालुक्यातील हगलुर या छोट्या गावातील आहेत. 2017 मध्ये मुंबई पोलीस दलात ते भरती झाले आहेत.

सध्या मुंबई पोलीस दलात मारोळ येथे कार्यरत असुन मरोळ मुख्यालयातून ज्या ठिकाणी ड्युटी लागेल त्या ठिकाणी त्याना जावे लागते. मुंबईत कोरोनाने थैमान घातले असल्याने दररोज मुंबईचा आकडा पाहून त्यांच्या कुटुंबीयांचे मन हेलावून जातं आहे. त्यांना बऱ्याच वेळेस आई-वडील सुट्टी वगैरे काढून गावाकडे ये असा आग्रह करत आहेत. मात्र असे असताना दुसरीकडे कर्तव्यावरुन असं भित्रेपणाने पाठ दाखवन योग्य होणार नाही हा विचार त्यांनी केला. ज्या खाकीने आयुष्याला आकार दिला, आयुष्यात नवीन रंग भरले स्वतःला एक ओळख दिली त्याच्याशी प्रतारणा करायची नाही. खाकीची आज देशाला, राज्याला गरज असताना गावाकडे जाणे हा निव्वळ पळपुटे पणा आहे, येथून सुट्टी घेऊन त्याना जाता आले असते, मात्र आयुष्यभर स्वतःच्या मनात खजिलपणाची भावना राहिली असती असे मत त्यानी व्यक्त केले. त्यामुळे पहिल्यांदा कर्तव्य व त्यानंतर वैयक्तिक आयुष्य असा निर्णय त्यांनी घेतला. मुंबईत करोनाने थैमान घातलेले असताना आज अनेक ठिकाणी बंदोबस्तावर, तसेच नाका-बंदी, विविध गार्ड, पेट्रोलिंग अशा बऱ्याच पॉईंटवर बऱ्याच ठिकाणी ते जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहेत.

बालाजी घुगे यांच्या लग्नाची तारीख पाच मे होती, तेव्हा त्यानी कुटुंबाला विश्वासात घेऊन तिथे येणं किती चुकीचे आहे, असे सांगून दोन्ही परिवाराला लग्न पुढे ढकलण्याची विनंती केले. साहजिकच मुलाचे व जावयाचे म्हणणे बरोबर वाटल्याने त्यानीही लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. लग्नाची स्वप्न पाहत जगणाऱ्या आजच्या तरुणाईसमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पहिल्यांदा कर्तव्याला दिलेले प्राधान्य हे इतरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.