आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे देशात सोयाबीनला उच्चांकी भाव मिळत असून, गेल्या २२ दिवसात ३०० रुपयांची वाढ मिळाली. गेल्या ३ एप्रिलला ४ हजार ३८१ रुपये क्विंटल असलेले सोयाबीनचे भाव शुक्रवारी मात्र ४ हजार ७६३ रुपयांवर पोहोचले. पुढील महिन्यात भावात आणखी वाढ होण्याची शक्यता कीर्ती उद्योगसमूहाचे अशोक भुतडा यांनी व्यक्त केली.
एप्रिलअखेपर्यंत सोयाबीनचा भाव ४ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज ३ एप्रिलला भुतडा यांनी वर्तविला होता. मे महिन्यात अर्जेटिनातील सोयाबीन बाजारपेठेत येते. हवामान बदलामुळे जगात उच्चांकी उत्पादन करणाऱ्या ब्राझील व अर्जेटिनातील सोयाबीन उत्पादनावर परिणाम झाला आहे. आतापासूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खरेदीदार सोयाबीन उत्पादनावर लक्ष ठेवून आहेत. सिंगापूर येथे त्याचे सौदेही केले जात आहेत.
लातूर बाजारपेठेत शुक्रवारी सोयाबीनला ४ हजार ७६३ रुपये, तर मुंबई बाजारपेठेत माल पोहोचल्यावर ४ हजार ९०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. दरम्यान, यंदा पाऊस लांबल्यास सोयाबीनच्या पेऱ्यावर त्याचा परिणाम होईल. सोयाबीनचे बियाणे बाजारपेठेत मिळण्यास अडचण होणार आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी बाजारातील बियाणांवर विसंबून न राहता घरचे बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे ठेवताना दुबार पेरणीचे संकट लक्षात घ्यावे. एकरी किमान ३० किलो बियाणे पेरणीस लागते. पुढील वर्षी हवामान बदल कसा होईल, त्यावर सोयाबीनचा भाव अवलंबून राहील. मे महिन्यात सोयाबीनचा भाव ५ हजारांच्या दिशेने वाटचाल करेल, असा अंदाजही बाजारपेठेतील जाणकार व्यक्त करीत आहेत.