शहरी आरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कामातील गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर समितीचे इतिवृत्तच गायब झाल्याचा आरोप नगरसेवक व समितीचे सदस्य शेखर माने यांनी केला आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे सदस्य शेखर माने हे शहरी आरोग्य समितीचे सदस्य आहेत. या समितीची गेल्या दोन वर्षांत एकही सभा झाली नाही. शासनाच्या २००५ च्या धोरणानुसार शहरात कुटुंब कल्याण आणि आरोग्य अभियान अंतर्गत वेलफेअर सोसायटीची स्थापना करण्यात आली. यामध्ये आयुक्त अध्यक्ष आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी सचिव आहेत. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. दरवर्षी या विभागासाठी लाखो रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येते.
कामकाजाच्या नियोजनासाठी समितीची महिन्यातून एक बठक अपेक्षित असताना गेल्या दोन वर्षांत एकही बठक झालेली नाही. समितीच्या मान्यतेविना तरतूद करण्यात आलेला निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये नोकरभरतीसारखा संवेदनशील विषय, कर्मचाऱ्यांना मुदतवाढ, विनानिविदा औषध खरेदी आदी व्यवहार झाले आहेत. याची चौकशी करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्बारे करण्यात आली होती. यावर विभागीय आयुक्तांनी आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असेही शेखर माने यांनी सांगितले.