महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल २७ किंवा २८ मे रोजी तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात लागण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली असून निकालाची तारीख लवकरच राज्य मंडळ जाहीर करणार आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा झाल्यानंतर साधारणत दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवडय़ात बारावीचा आणि जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. यावर्षी शिक्षकांच्या संपामुळे अनेक दिवस शिक्षण मंडळात विद्यार्थ्यांच्या उत्तपत्रिका पडून असल्यामुळे तपासणीचे काम लांबणीवर पडणार आणि निकाल नेहमीपेक्षा उशिरा लागणार अशी शक्यता होती. मात्र
सर्व विभागीय मंडळाचे बारावी
पेपर तपासणीचे काम अंतिम  टप्प्यात येत्या आठ ते दहा दिवसात ते पूर्ण होईल आणि निकालाची तारीख
घोषित केली जाण्याची शक्यता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त
केली.
नागपूर विभागीय मंडळासह कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पुणे मंडळातील बारावीच्या परीक्षेचे काम पूर्ण झाले असून मुंबई मंडळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दहावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात असून जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात तो जाहीर करण्याची शक्यता आहे. बारावी आणि दहावीचे निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांच्या अ‍ॅडमिशनची प्रक्रिया लवकर सुरू होईल.
दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात संदर्भात शिक्षण सचिवांनी नुकतीच मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यात बारावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. मंडळाने त्या दृष्टीने तयारी केली असून येत्या पुढील आठवडय़ात बारावीच्या निकालाची तारीख घोषित होण्याची शक्यता असल्याची माहिती मंडळाच्या सूत्रांनी दिली.