शहरातील गुलमंडी परिसरात हुरडाबाजार विस्तारू लागला आहे. शहराशेजारच्या गावातील गोकुळाष्टमीला लावलेली ज्वारी हुरडय़ात आली आणि बाजाराची नस ओळखणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांनी त्याचे चुंगडे बांधले. ज्याचा हुरडा अधिक कोवळा त्याला अधिक भाव. कोठे भाव शंभर रुपये किलो, एखाद्या ग्राहकासाठी तो भाव १५० रुपये. काही शेतकरी आता हुरडा शेती करू लागले आहेत. बाजाराची नस म्हणतात ती अशी!
  सुरेश िशदेचे गाव शहरापासून ३५ किलोमीटर दूर. ते रोज एक ५० किलोचे पोते हुरडा भरून आणतात. हिरवा लुसलुशीत हुरडा दृष्टीला पडला, की दुचाकीवरून जाणारा सहज म्हणून भाव विचारतो. विकणाऱ्याने चव दाखवली, की थोडीशी भावात घासाघीस होते. किमान १०० रुपये किलोने विक्री सुरू असल्याने िशदेसारख्या अनेकांना त्यांचा चांगला फायदा होऊ लागला आहे.
 औरंगाबाद शहरातील बहुतांश व्यक्तींची नाळ अजूनही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. त्यामुळे हुरडा आला, की त्याची चव घेण्यासाठी हुरडा विक्रेत्यांच्या भोवती गर्दी झालेली असते. हुरडा विक्रेते िशदे म्हणाले, आता आम्ही हुरडय़ासाठी चांगली असणारी ज्वारीच लावतो. चार एकरात हा प्रयोग केला. कोणत्याही नगदी पिकापेक्षा हे परडवणारे आहे. गोकुळाष्टमीला पेरणी केली, की या दिवसात हुरडा येतो. दुष्काळ असल्याने भोवतालचे शेतकरी हैराण आहेत. पण हुरडा शेती फायद्याची ठरत आहे.
 दुपारी ४ वाजता विक्रीला यायचे आणि रात्री परत जायचे, असा अनेक शेतकऱ्यांचा दिनक्रम आहे. अनेक जण हुरडय़ाची लुसलुशीत चव जिभेवर चाळवतात आणि हुरडा घेऊनच जातात. सध्या ज्वारीचे दर ४० रुपये किलो आहे. हुरडा मात्र १००-१२५ पर्यंत गेला.