सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे अनेकांवर संकट आलं. अनेक नागरिकांना पुराचा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर आता शहरी आणि ग्रामीण भाग सावरण्यासाठीचे प्रयत्न सरकारने सुरु केले आहेत. प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. प्रसंगी त्यासाठी कर्ज काढू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यात शासकीय बैठकीसाठी चंद्रकांत पाटील हे आले असताना. त्यानंतर सांगली आणि कोल्हापूर येथील नागरिकांचे पुनर्वसन कशा प्रकारे करणार त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात ४ लाख ५३ हजार लोकांना पुरस्थितीतून सुरक्षित बाहेर काढले असून पुरामुळे कोणी अडकले नाही. तसेच राज्यात ५०० च्या वर निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. या निवारा केंद्रात ३ लाखापेक्षा जास्त लोक राहत आहेत. कोल्हापूरमध्ये २ कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. पुराचा फटका बसलेल्या गावच पुनर्वसन सहा ते आठ महिने चालणार आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, ६ हजार ८०० कोटीमध्ये शेती नव्याने उभा करावी लागणार आहे.

पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, प्रत्येक आठवड्याला होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा पूर परिस्थिती मुळे स्थगित करण्यात आला होता. यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याविषयी बोलणे त्यांनी टाळले.  ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त गावे दत्तक घेण्यासाठी अनेक संस्था आणि व्यक्ति पुढे येत आहेत. त्यामध्ये पंढरपूर देवस्थान ५ आणि नाना पाटेकर यांची नाम संस्था २ गावं दत्तक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीतही  घरफोड्या : चंद्रकांत पाटील
सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थितीमध्ये घरफोड्याचे प्रकार घडले असून काही ठिकाणी ग्रामस्थांनी आमच्या गावाला मदत पाहिजे. असे सांगून मदतीचे आलेल्या ट्रक मधील साहित्य खाली करून घेतले आहे. त्यामुळे मदत करणार्‍यांनी प्रशासनाशी समन्वय साधून मदत पाठवावी. असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पोलिसांना विशेष पथके नेमून त्यावर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.