सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून केली जात असलेली चोरटी मद्य वाहतूक उघडकीस आणून सुमारे साडेआठ लाखाचे गोवा बनावटीचे मद्य रविवारी रात्री कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव पथकर नाक्यावर पकडण्यात आले. चोरटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांनी सोमवारी दिली.

महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बोरगाव पथकर नाक्यावर गस्त सुरू केली होती. यावेळी टोयाटो वाहन (एमएच ०३ एझेड ५८३६) हे वाहन आले. या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन तसेच पुढे नेण्यात आले. गस्ती पथकाने पाठलाग करून वाहनाची झडती घेतली असता वाहनात ८ लाख ५२ हजाराचे गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. या प्रकरणी वाहनातील हर्षद जाधव आणि गणेश जाधव या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संदेश पवार (रा. पाचेगाव ता. सांगोला) याच्या सांगण्यावरून ही मद्य वाहतूक होत असल्याचे सांगितले.

हेही वाचा…सांगली : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात मुलाचा अंत

या माहितीनुसार पवार याच्या राहत्या घरी झडती घेतली असता रिकाम्या बाटल्या, सीलबंद करण्याचे साहित्य मिळून आले. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.