विश्वास पवार

वाई : सातारा लोकसभेसाठी महायुतीत भाजप व राष्ट्रवादी शिवसेना या पक्षात रस्सीखेच सुरू असताना व  उमेदवारी जाहीर व्हायला उशीर होत असल्यामुळे सातारा लोकसभेच्या घडामोडी वाढल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.

खासदार उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी मिळणार, याची खात्री असताना उमेदवारीची प्रतीक्षा ही कायम राहिल्याने उदयनराजेंनी रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तर उदयनराजे अजून राज्यसभेवर आहेत, असे सांगत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिहराजे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंवर वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. सातारा मतदारसंघावर माझा नैसर्गिक हक्क असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट करत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत म्हणाले, “या अटकेवरून…”

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष भाजपाचे नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. सातारा मतदारसंघावर माझा नैसर्गिक हक्क असल्याचे स्पष्ट करत पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर नरेंद्र पाटील यांनी नेतृत्वाने संधी दिल्यास पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपा सेना युतीमध्ये शिवसेना लढवत आली आहे.  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोणालाही मतदारसंघ व उमेदवार जाहीर झालेला नाही. खासदार उदयनराजे उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. उदयनराजेंचे त्यांना उमेदवारी मिळण्यास उशीर झाल्याने कार्यकर्तेही आक्रमक झालेले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुरुषोत्तम जाधव यांनी भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंची  भेट घेतली तसेच चर्चा केली. त्यामुळे चर्चाना उधाण आले. त्यामुळे सातारा लोकसभेच्या घडामोडी वाढल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांना सातारची उमेदवारी दिली तर रिपाईंला सोलापूर आणि शिर्डी मतदारसंघ सोडावा. कारण महायुती आमच्यामुळे झाली असून, सत्ता कशी बदलायची हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा रिपाईं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.