प्रसेनजीत इंगळे

महिना उलटूनही केवळ सहा रुग्णालयांचे  परीक्षण

विरार :  विरारमधील  विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीने खळबळून जागे झालेल्या पालिकेने २७७ रुग्णालयांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. पण आता महिना उलटला तरी  केवळ  सहा रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण झाले आहे. अजूनही शेकडो रुग्णालयांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

विरारमधील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा लेखापरीक्षणावरून रणकंदन माजले होते. पालिकेने आपली बाजू सांभाळत शहरातील सर्वच रुग्णालयांना अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण  करण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. यासाठी पालिकेने १५ दिवसांची मुदत दिली होती. यातही पालिकेने सध्या सुरू असलेल्या ४५ कोविड रुग्णालयांना तातडीने या यंत्रणा अद्ययावत करण्याचे आदेश दिले होते.

पण केवळ पालिकेच्या सहा रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण झाले आहे. तर उरलेल्या ३९ रुग्णालयांची पाहणी महापालिकेने केली. यात काही रुग्णालयांना यंत्रणा नव्याने सक्षम करण्याचे आदेश दिले तर काहींना आपल्या त्रुटी पूर्ण करण्याचे सांगितले होते. पण आता महिना उलटला तरी अजूनही या रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण झाले नाही आहे. यामुळे शहरातील सुरू असलेली शेकडो रुग्णालये रुग्णांच्या जीवावर उदार होऊन सुरू आहेत. इतर विनाकोविड रुग्णालयांच्या बाबतीतसुद्धा भिजत घोंगडे आहे.

आतापर्यंत किती रुग्णालयांनी पुढाकार घेऊन आपले अग्निसुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण करून पालीकेकडे अहवाल सादर केले. पालिकेच्या अग्निशमन विभागाने किती रुग्णालयांची पाहणी केली या संदर्भात कोणतीही माहिती अग्निशमन विभागाने दिली नाही. केवळ नोटीस बजावल्याच कांगावा अग्निशमन विभागाकडून केला जात आहे.

शहरातील अनेक रुग्णालयाने ही अनधिकृत इमारतीत वसलेली आहेत, अनेक रुग्णालयांत आपत्कालीन मार्ग नाही आहेत. काही रुग्णालये ही मोठय़ा लोकवस्तीत आहेत. काही रुग्णालयांत जाण्यासाठी मोठे मार्ग नाहीत. असे असतानाही रुग्णालये बिनदिक्कत सुरू आहेत. यामुळे रुग्णाच्या जीवाचा खेळ सुरू असतानाही पालिका केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे.

नोटीस बजाव धोरण

विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटनेनंतर पालिकेने २७७ रुग्णालयांना अग्निसुरक्षा लेखा परीक्षणाच्या नोटीसा बजावल्या. या अगोदर भंडारा जिल्ह्यत लागलेल्या आगीनंतरही  रुग्णालयांना नोटीसाद्वारे अग्निसुरक्षा लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. मुंबईत मॉल लागलेल्या आगीनंतरसुद्धा पालिकेने मोठय़ा दुकानांना नोटीस बजावल्या. २०१९ मध्ये सुरत लागलेल्या आगीनंतर पालिकेने चार हजारहून अधिक आस्थापनांना नोटीस बजावल्या होत्या. इतक्या वेळा नोटीस बजावूनही आजतागायत पालिकेने एकही आस्थापनावर कोणतीही कारवाई केली नाही. या बजावलेल्या नोटिसांचे कोणतेही अहवाल पालिकेकडे उपलब्ध नाहीत. यामुळे पालिकेच्या नोटीस धोरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पालिकेने सर्व रुग्णालयांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत, त्यावर कारवाईसुद्धा सुरू आहे. काही रुग्णालयांची पाहणीसुद्धा झाली आहे,  यात रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा यंत्रणेत असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच संपूर्ण अहवाल सदर केला जाईल.

आशीष पाटील, अतिरिक्त आयुक्त वसई विरार महानगरपालिका