भंडारा : भंडारा हा पूर्व महाराष्ट्रातील १.२ दशलक्ष लोकसंख्येचा जिल्हा आहे. येथे मोठे प्रकल्प गुंतवणूक करण्यास मागे-पुढे पाहत असले तरी लघुउद्योगांनी मात्र भरारी घेतली आहे. २०२२ ते २३ या वर्षात जिल्ह्यात ४१,८६२ सूक्ष्म-लघु-मध्यम (एमएसएमई) स्वरूपाचे उद्योग सुरू झाले आहेत.

सप्टेंबर २०१५ पर्यंत भंडारा जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची संख्या केवळ १८१ होती. २०१९ मध्ये ती ४ हजार ६९८ एवढी झाली. २०२३ पर्यंत ही संख्या ४१ हजार ८६२ वर गेली. यात ७४७.२४ लाखांची गुंतवणूक झाली. ५३ हजार लोकांना रोजगार मिळाला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २०१९ मध्ये १६. ८६ कोटींची, २०२० ते २१ मध्ये ४९ लाखांची तर २०२३- २४ मध्ये १२२ प्रकल्पांमध्ये ५.९३ कोटींची गुंतवणूक करण्यात आली. मात्र केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाला अत्यंत कमी प्रतिसाद असून २०२३-२४ पर्यंत ३१ प्रकल्पांमध्ये ३.४० कोटींची गुंतवणूक झाली.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात चुरशीच्या लढती

आरोग्य क्षेत्राला चालना

जिल्ह्यात आरोग्य विभागातील सेवा सुविधांमध्येही सुधारणा झाली. जिल्ह्यात एकूण १० सार्वजनिक रुग्णालये, १ विशेष विभाग (कॅन्सर, टी.बी. ई.), ३४ सार्वजनिक दवाखाने, शिवाय १९३ उपकेंद्रे आहेत. महिला रुग्णालयाचे काम मागील पाच वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील ३३ सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी १० याप्रमाणे ३३० खाटांची व्यवस्था आहे. अतिदक्षता विभागातील ६ खाटांची संख्या आता १५ वर आली आहे, तर क्रिटिकल केअर लॅबमध्ये ५० खाटांची व्यवस्था आहे. सार्वजनिक रुग्णालयात रुग्णांसाठी एकूण १४१२ खाटांची संख्या आहे. २०१५ मध्ये डायलॅसिस विभागात दहा यंत्रणे आणि दहा रुग्णशय्या आहेत.

रस्ते बांधणीत प्रगती

दळणवळण, रस्ते बांधणीतही प्रगती झाली आहे. कधीकाळी एकमेव पूल असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील दोनच वर्षांत रोहा, आंभोरा आणि पूर्णत्वास येत असलेला कोरंभी अशा तब्बल तीन पुलांची भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत ३३१३.६१ किमीचे ग्रामीण रस्ते तर १३१७.५५ किमीचे इतर असे एकूण ४६३१.१५ रस्त्यांचे बांधकाम झालेले आहे. याशिवाय २५०.७० किमी राष्ट्रीय महामार्ग तर ४८१.६७ किमीचे राज्य महामार्गाचे जाळे आहेत. प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते एकूण ६७६३.७० किमीचे काम झालेले आहे.