लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : वृद्ध बहिणीच्या नावाने बनावट बँक खाते तयार करून त्या आधारे विविध कार्यकारी सोसायटी आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे ७५ लाख रूपयांचे कर्ज काढले आणि ती संपूर्ण रक्कम परस्पर काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून वृद्ध बहिणीची फसवणूक केली. माळशिरस तालुक्यातील आनंदनगर विविध कार्यकारी सोसायटीत हा प्रकार घडला यात सोसायटीचा अध्यक्ष असलेल्या भावासह इतर नातेवाईकांचा सहभाग उजेडात आला आहे.

ज्योती आनंदराव काकडे (वय ७५, रा. निंबूत, ता. बारामती) यांनी यासंदर्भात अकलूज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आनंदनगर विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्ष असलेला त्यांचा भाऊ हिंदूराव सदाशिवराव माने-पाटील, भाचे सुजय आणि अजिंक्य तसेच चुलत भाऊ शशिकांत नारायणराव माने-पाटील (सर्व रा. बागेची बाडी, ता. माळशिरस) आणि बहीण रोहिणी प्रकाशराव काकडे (रा. नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.,दि. ३० मार्च २००९ ते ११ मे २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. उल्लेखनीय बाब म्हणजे यातील फिर्यादी आणि आरोपी सर्व उच्चभ्रू घराण्याशी संबंधित आहेत.

आणखी वाचा-अलिबाग : विश्वास नागरे पाटील यांच्या नावाने महिलेकडून ४० लाख लुटले….

ज्योती काकडे यांना आपल्या नावाने आपल्याच भवंडांनी बनावट कागदपत्रे तयार करून कर्जे घेऊन त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आनंदनगर विविध कार्यकारी सोसयटी आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकलूज शाखेशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला. त्यातून हा धक्कादायक प्रकार दिसून आला. ज्योती काकडे व त्यांची बहीण रोहिणी काकडे या दोघींच्या नावाने खोटे आणि बनावट संयुक्त बँक खाते उघडले. तसेच सुमारे ७५ लाख रूपयांचे कर्जही काढून घेऊन ते बँक खात्यातून काढूनही घेतल्याचे दिसून आले. याबद्दलची वस्तुस्थिती माहीत असूनही ती फिर्यादी ज्योती काकडे यांना न देता या फसवणुकीच्या गुन्ह्यात संगनमत करून बहीण रोहिणी काकडे व चुलत भाऊ शशिकांत माने-पाटील आदींनी या कृत्यामध्ये सहभाग घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे