सोलापुरात यंत्रमाग उद्योग नियमांच्या अडथळय़ांमुळे बंदच!

शहरातील ९० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू होण्यास अडचण

संग्रहित छायाचित्र

एजाजहुसेन मुजावर

वाढत्या करोना प्रादुर्भावामुळे ‘ रेड झोन’ मध्ये असलेल्या सोलापुरात नियम व अटी पाळून यंत्रमाग उद्योग सुरू करण्याची मुभा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. परंतु यात शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळण्यात आल्यामुळे शहरातील ९० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे.

शहरात पूर्वभागात यंत्रमाग उद्योग मोठय़ा प्रमाणात आहेत. सोलापुरी चादर, टॉवेल, टेरी टॉवेल, बेडशिट आदी उत्पादने तयार करणाऱ्या यंत्रमाग उद्योगावर सुमारे ४० हजार कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न अवलंबून आहे. गेले दोन महिने टाळेबंदीमुळे यंत्रमाग उद्योग बंदच असल्यामुळे ४० हजार कामगारांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. दुसरीकडे सुमारे ७० हजार कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला विडी उद्योगही बंदच आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने टाळेबंदीत शिथिलता आणताना ‘ रेड झोन’ मधील उद्योग पूर्ववत सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. त्याप्रमाणे मालेगाव व भिवंडीच्या धर्तीवर सोलापुरातही यंत्रमाग उद्योग सुरू करण्याची मागणी ‘सिटू’चे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केली होती. त्यावर पाठपुरावाही सुरू ठेवण्यात आला असताना अखेर मंगळवारी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी एका आदेशानुसार यंत्रमाग उद्योग सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र यात शहर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळण्यात आल्यामुळे उद्योग सुरू करण्यात अडचण निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्हा यंत्रमाग उद्योग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी, शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतच बहुतांश यंत्रमाग उद्योग असल्यामुळे उद्योग सुरू करण्यात अडचणी येणार आहेत. इतरही अनेक अडचणी आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे आपण पाठपुरावा करीत आहोत. येत्या तीन-चार दिवसांत त्यातून योग्य मार्ग निघण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.

हद्दीची अडचण

शहरात बहुतांश यंत्रमाग अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात आहेत. शहरात अन्य भागातही यंत्रमागावर चादर व टॉवेलसह बेडशिटचे उत्पादन घेतले जाते. शहराबाहेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंत्रमाग उद्योग जवळपास नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यंत्रमाग उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली तरी ती शहरासाठी उपयोगी ठरत नाही.

प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांना विरोध

यंत्रमाग उद्योग सुरू करताना तेथील कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यासह इतर नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे करोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या कामगारांना कामावर बोलावता येणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे. यंत्रमाग कामगारांच्या वसाहती प्रामुख्याने प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यामुळेही कामगारांना यंत्रमाग कारखान्यात काम करण्यासाठी जाणे अडचणीचे होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Machine spinning industry closed in solapur due to obstructions abn

ताज्या बातम्या