राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांनी सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ नवीन विधेयके तर विधान परिषदेतील प्रलंबित तीन आणि विधानसभेतील प्रलंबित दोन अशी एकूण १६ विधेयके मांडण्यात येणार आहेत. त्यात भूसंपादनाच्या विविध कायद्यांचे परिवर्तन करून केंद्र सरकारच्या धर्तीवर मोबादला देणारा कायदा करण्याचे विधयेक, प्रधानमंत्री आवास योजनेत आर्थिक दुर्बलांना विकास शुल्कात सवलत देण्याचा कायदा करण्याचे विधेयक अशा विविध लोकोपयोगी कायद्यांसाठीच्या विधेयकांचा समावेश आहे. सोमवारी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकतानाच अभिभाषणादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपालांचे अभिभाषण मराठीत नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते.