scorecardresearch

Maharashtra Assembly Session: महाराष्ट्रात ‘कोयता गँग’ची दहशत! अजित पवारांनी थेट विधानसभेत उपस्थित केला मुद्दा; म्हणाले, “हवं तर त्यांना..!”

अजित पवार म्हणतात, “हे जातात आणि दहशत निर्माण करतात, महिलांना दमदाटी करतात, हॉटेलमध्ये जाऊन…!”

Maharashtra Assembly Session: महाराष्ट्रात ‘कोयता गँग’ची दहशत! अजित पवारांनी थेट विधानसभेत उपस्थित केला मुद्दा; म्हणाले, “हवं तर त्यांना..!”
अजित पवारांनी विधानसभेत केला 'कोयता गँग'चा उल्लेख! (फोटो – विधानसभा कामकाज)

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे यंदाचं अधिवेशनही वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ही शक्यता खरी ठरू लागली आहे. आधी विकासकामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केल्यानंतर खडाजंगी झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी रस्ता सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावरून वाद झाला. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘कोयता गँग’बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण वाढलं आहे. महाराष्ट्रात, विशेषत: शहरी भागांमध्ये कोयता गँगची दहशत वाढू लागल्याची चिंता अजित पवारांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी स्थगन प्रस्ताव मांडत ‘कोयता गँग’चा मुद्दा उपस्थित केला. “राज्याच्या विविध भागांत अशा काही घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग निर्माण झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिलं देत नाहीत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होतंय”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

विश्लेषण : पुण्यातील कोयता गँगची दहशत कोण मोडणार?

“जी मुलं पकडली जातात, ती कॉलेजची मुलं आहेत. कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी बघतात, चित्रपट बघतात आणि असा दारू पिऊन गोंधळ घालतात”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.

“हवंतर त्यांना मोक्का लावा, पण…”

“माझी सरकारला विनंती आहे, की हे कुठल्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. पोलीस दलाच्या आपण मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. तो तुमचा अधिकार आहे. पण त्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे कोयता गँगचे प्रकार होता कामा नयेत, असे आदेश द्यावेत. हवं तर त्यांना मोक्का लावा, तडीपार करा, जी कुठली कठोर कारवाई करायची असेल ती करा”, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

“हे कुठल्या पक्षाशी संबंधित नसतात. त्यामुळे यांना पक्ष वगैरे काही नाही. फक्त दहशत निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त केला गेलाच पाहिजे. कृपया याची नोंद सरकारने घ्यावी”, असं ते म्हणाले.

शहरातील हडपसर, मांजरी भागात कोयता गँगने दहशत माजविली होती. रात्री अपरात्री नागरिकांच्या घरांवर दगडफेक, तक्रार करणाऱ्या नागरिकांना धमकावणे तसेच वाढत्या दहशतीमुळे हडपसर, मांजरी भागातील ग्रामस्थांनी नुकताच हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. पुण्यासह राज्यातील नागरिक दहशतीखाली आहेत. गुंड टोळ्यांवर कठोर कारवाईची मागणी अजित पवार यांनी अधिवेशनात केली. मंगळवारी (२० डिसेंबर ) त्यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

दहशत माजविणाऱ्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करावी तसेच गुंडाना शहरातून तडीपार करण्याची मागणी पवार यांनी केली. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत हडपसर भागातील गुंड टोळ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी हडपसर पोलिसांनी या भागातून संचलन केले. हडपसर, मांजरी भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 13:25 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या