राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा केला जाणार असून तो मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला आहे. दहा वेगवेगळ्या खात्यांची मंजुरी घेतल्यानंतर त्यास राष्ट्रपतीची मान्यता मिळणार असून त्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करीत आहे. केवळ गोवंश बंदी न करता गाय हा आपल्या अर्थकारणाचा भाग व्हावा, या दिशेने राज्याचे धारण राबविले जाणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे बोलताना व्यक्त केले.
कोल्हापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी येथे १९ ते २५ जानेवारी अखेर भारतीय संस्कृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा आरंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. कणेरी मठाच्या परिसरात देशी गायींचे जतन व्यापक प्रमाणात केले जात असून विविध जातींच्या गायींचे संवर्धनही मठाधिश श्री काडसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून केले जात आहे. हा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये आपल्या देशी गायींवर संशोधन केले जात आहे. आपल्याकडे मात्र देशी गाय पालनाकडे दुर्लक्ष होत आहे. देशी गायींच्या संगोपनामुळे अनेक फायदे होतात असे संशोधनाअंती दिसून आले आहे. केंद्र शासनाने देशी गायींची वाढ व्हावी यासाठी एक योजना हाती घेतली आहे. ती राज्यात व्यापक प्रमाणात कशी राबवता येईल याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कणेरी मठाप्रमाणे देशी गायींचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यभरात प्रयत्न केले जातील, असा निर्वाळा त्यांनी दिला.
राज्यातील बावीस हजार गावांना दुष्काळाची झळ बसत आहे असा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने विशेष भर दिला असून या वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५ हजार गावे दुष्काळ  मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. जलसंधारणाकडे आपले शासन गांभीर्याने पाहत असून खोरेनिहाय आराखडय़ाचे काम सुरू केले आहे. याअंतर्गत गोदावरी खोऱ्यामध्ये पहिले काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा आराखडा ३१ मार्चपर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर अन्य खोऱ्यांचा आराखडा बनवून कालबद्ध प्रकल्प राबविले जाणार आहेत.