मुंबई : देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठय़ा कष्टाने मिळालेले आहे. परंतु स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत भाजप १४ ऑगस्ट हा दिवस स्मृतिदिन म्हणून साजरा करत आहेत हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न काँग्रेस हाणून पाडेल, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केले.

काँग्रेसच्या टिळक भवन प्रदेश मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पटोले  म्हणाले की, भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशात हुकूमशाही सुरू झाली. परंतु जगातील सर्वात मोठा व गौरवशाली लोकशाही देश म्हणून भारताचा जगात लौकिक आहे. भाजप त्याला तिलांजली देऊ पाहत आहे. १४ ऑगस्ट हा फाळणीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. त्या रक्तरंजित दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप देश तोडण्याचे काम करीत आहे. जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. देशाच्या एकात्मतेला धक्का पोचविण्याचे भाजपचे हे मनसुबे काँग्रेसचे कार्यकर्ते हाणून पाडतील.

वळसे-पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

गेल्या ७५ वर्षांत काहीच घडले नाही, असे काहीजण म्हणत असले, तरी या काळात केलेले काम आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जे काम केले, त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदेश राष्ट्रवादी भवनात तर मुंबई विभागीय कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गेल्या ७५ वर्षांत काँग्रेसच्या राजवटीत उद्योग, शेती, तंत्रज्ञान यांसह सर्वच क्षेत्रांत देशाची मोठी प्रगती झाल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजप मुख्यालयात पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राज पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शहा, प्रदेश सचिव दिव्या ढोले, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख, कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.