विजय चव्हाण यांचे बालपण गिरणगावात गेले. भारतमाता चित्रपटगृहामागे असलेल्या हाजी कासम चाळीत त्यांचे लहानपण गेले. अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतरही तब्बल २५ वर्ष त्यांनी गिरणीत नोकरी क रून नाटक-चित्रपटांतून अभिनयाची आघाडीही तितक्याच उत्साहाने सांभाळली. १९८५ साली आलेला वहिनीची माया हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती रंगभूमीवर आणि तेही मोरुची मावशी या नाटकातील त्यांच्या भूमिकेमुळे ते घराघरांतून लोकप्रिय झाले. मोरुची मावशी या नाटकासाठी खरेतर आधी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारणा झाली होती. मात्र काही कारणास्तव त्यांना ते नाटक करणे शक्य नव्हते. लक्ष्मीकांत बेर्डेनी नाटकाचे दिग्दर्शक  दिलीप कोल्हटकर यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यानंतर मात्र जणू या भूमिके साठीच त्यांचा जन्म झाला असावा इतक्या तन्मयतेने विजय चव्हाण यांनी मोरुची मावशी साकारली. त्यावेळी गिरणीतील नोकरी सांभाळून ते मोरुची मावशी या नाटकाचे प्रयोग रंगवत असत. एकाचवेळी नाटक आणि चित्रपटांमधूनही त्यांनी कामे केली. आपल्यावर ज्येष्ठ रंगकर्मी विजयाबाई मेहता यांच्या शिकवणीचा पगडा आहे असे ते सांगत. विजयाबाईंच्या ‘हयवदन’ या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. वक्तशीरपणा, प्रत्येक भूमिको त्यातील बारकावे शिकून समरसून साकारण्याची सवय विजयाबाईंमुळे अंगवळणी पडल्याचे ते म्हणत असत. मोरुची मावशी या नाटकानंतर तशाच प्रकारे स्त्री पात्र चित्रपटांमधून रंगवण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. मात्र विनोद हा निखळ असला पाहिजे, तो लोकांना सहकुटुंब अनुभवता आला पाहिजे यावर ठाम असलेल्या विजय चव्हाण यांनी निवडक विनोदी भूमिकांवर कायम भर दिला.

हलाल या शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित चित्रपटात ते बऱ्याच वर्षांनी गंभीर भूमिकेत दिसले होते. हलाल हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणता येईल. याचवर्षी त्यांना राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. योगायोग म्हणजे याचवर्षी संस्कृती कलादर्पण आणि अंबरनाथ चित्रपट महोत्सव या दोन्ही सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरच्या इतिहासातील बदलत गेलेले प्रवाह अनुभवलेला एक खंदा कलाकार हरपल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे.

सहकलाकारांनाही तितकेच महत्त्व देणारा दुर्मिळ कलाकार – प्रशांत दामले

आम्ही मोरुची मावशी नाटकासह अनेक चित्रपट-नाटकांमध्ये एकत्र काम केले. प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर काम करताना पहिली गोष्ट ही जाणवली आणि ती तितकीच खरी होती की तो एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात काम करताना आपल्या व्यक्तिरेखे इतकेच इतर कलाकारांच्या भूमिका महत्त्वाच्या मानायचा. तेवढेच महत्त्व द्यायचा. सहकलाराचा जास्त विचार करायचा. सहकलाकाराचे काम चांगले झाले तर आपले काम चांगले होईल, असे तो मानायचा. भूमिका साकारताना अभिनेता म्हणून प्रत्येक दृश्य रंगवण्याचा प्रयत्न तो करायचा. हे दृश्य (सीन) माझेआहे म्हणण्यापेक्षा हे दृश्य आपले आहे, असे तो म्हणायचा. तो कुठल्याही कलाकारासोबत छान जुळवून घ्यायचा. आणि इतर कलाकारांनाही त्याच्यासोबत काम करताना छान वाटायचे. कारण तो काम करताना प्रत्येकाला सांभाळून घ्यायचा. चुकांची दुरुस्ती करायचा. समजावून सांगायचा. म्हणून ३५-४० वर्षे सातत्याने तो काम करू शकला. कुठल्याही वयोगटाबरोबर काम करताना त्याचे उत्तम जमायचे. तो हसतमुख होता. ग्रुपला सांभाळायचे कसे, हे त्याला छान जमायचे. सुरुवातीची १० वर्षे आम्ही एकत्र काम केले तो काळ आश्चर्यकारक (वंडरफुल) होता. मोरुच्या मावशीच्या निमित्ताने खूप दौरे झाले. फिरणे झाले, धमाल करायचो. पण काम करायचे असायचे तेव्हा तो कामच करायचा. विनोद करताना तो विचारपूर्वक करायचा. कमरेखालचे विनोद टाळायचा. विनोद करताना काळजी घ्यायचा. त्याचे अभिनय क्षेत्रातील यशाचे कारण हेच की तो समजूतदार होता. कुठल्याही वयोगटातील कलाकार त्याच्याबरोबर काम करायला उत्सुक असायचे.

मोरुची मावशी नाटकाच्या दौऱ्यांविषयी काय सांगू, प्रत्येक क्षण तो जगलेला आहे. त्या सगळ्याच क्षणांविषयी बोलणे शक्य नाही. तो खूश असायचा, आमचा नाटकाचा संघ खूश असायचा. सबंध युनिट खूश असायचे. तो सेटवर आला की मस्त-धमाल-टाईमपास असायचा. त्याच ऊर्जेने तो संबंध दिवसभर काम करायचा. आता मला कंटाळा आला आहे, असे वाक्य फार क्वचित त्याच्या तोंडून ऐकायला मिळे. १८२ व्या प्रयोगानंतर मोरुची मावशी हे नाटक प्रेक्षकांनी उचलून धरले, ते ९०० व्या प्रयोगापर्यंत हाऊसफुल्ल सुरू होते. प्रत्येक प्रयोगाला टांग टींगाक करत, नाचत तो रंगमंचावर यायचा आणि वन्स मोअर घ्यायचा. तेव्हा कधीही मला कंटाळा आला, मी दमलो, माझे पाय दुखले असे म्हणायचा नाही. आमचे दिवसाला तीन प्रयोग असायचे. वन्स मोअर आला की तेवढय़ाच उत्साहाने तो पुन्हा सादरीकरण करायचा. प्रेक्षकांच्या इच्छा तो पूर्ण करायचा. इतक्या ताकदीचा तो कलाकार होता. त्यामुळे त्याच्या जाण्याने आमच्या पिढीतील एक मोठा कलाकार जो सहकलाकारांना

जास्त महत्त्व द्यायचा, असा एक दुवा निखळला आहे. त्याला विनोदी भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले तसे गंभीर भूमिकांसाठीही मिळाले.

त्यामुळे हे सिद्ध झाले होते की तो अष्टपैलू अभिनेता होता. त्याची अभिनयक्षमता जबरदस्त होती. टाईमपासच्या वेळेला टाईमपास आणि कामाच्या वेळेला काम ही त्याची वृत्ती होती. ८  ते अगदी ८० वर्षांच्या कलाकारांपर्यंत सर्वासोबत काम करताना तितकाच समरस व्हायचा. हाच त्याचा मोठेपणा होता.

चांगला मित्र गमावल्याचे दुख – अशोक सराफ

विजयच्या जाण्याने खरेच मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मी म्हणेन. तो हरहुन्नरी नट होता. मावशीची भूमिका तर अजरामर करून ठेवली. माझ्या एका चांगल्या मित्राला मी गमावले आहे. माझ्याबरोबर त्याने बऱ्याच चित्रपटातून कामे केली. विजय चव्हाणने ही भूमिका केली हे सांगण्याइतपत प्रत्येक वेळी स्वतंत्र छाप सोडली होती. एक नट, माझा चांगला मित्र गेल्याचे मला दु:ख आहे. त्याने शून्यापासून सुरूवात केली होती. त्याने या क्षेत्रात येण्यासाठी खूप मेहनत घेतली. मोरूच्या मावशीच्या भूमिकेने त्याने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. असे नट फार थोडे असतात जे स्वकर्तृत्त्वाने स्वत:चे स्थान निर्माण करतात. त्यापैकी तो एक होता. त्याची स्वत:ची अशी विनोद सादरीकरण करण्याची शैली होती. त्याच्या जाण्याने मी माझा मित्र गमावल्याचे दु:ख आहे.

विजू मामा, मोरु ची मावशी आणि सुयोग हे अतूट नाते -संदेश भट

१९८५ साली मोरुची मावशी नाटक आले. त्यानंतर गजरा या कार्यक्रमात विजू मामांनी पहिल्यांदा टांग टिंग टिंगाक असे गात त्याचे सादरीकरण केले. त्यानंतरचे मोरुच्या मावशीचे सगळे प्रयोग रंगत गेले. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाच्या वेळी त्यांनी सातत्य राखले. लग्नाच्या दिवशीही त्यांनी मोरुच्या मावशीचा प्रयोग केला होता. मोरुची मावशी या नाटकामुळे विजय चव्हाण आणि सुयोगचे नाव मोठे झाले. एक प्रसंग असा आहे की नाटकाला काही प्रेक्षक पुन्हा पुन्हा प्रयोग पाहण्यासाठी येत त्यात एक पाल्र्याच्या बाई होत्या. त्या नेहमी प्रयोगाला हजर असत. सलग ५ -६ प्रयोग त्यांनी बघितल्यामुळे त्यांच्यासाठी नाटय़गृहात एक जागा रिकामी ठेवण्यात यायची. मोरुच्या मावशीच्या भूमिकेत त्यांनी स्त्री व्यक्तिरेखा इतकी हुबेहूब साकारली होती की ते ओळखूच यायचे नाहीत, हे सर्वज्ञात आहेच. कलाकार आणि व्यक्ती म्हणून ते मोठे होते. त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडीविषयी सांगायचे तर त्यांना मासे खायला खूप आवडायचे. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर मासे खायला जाऊ या असे ते म्हणायचे.  त्यांनी लोकप्रियतेचे कधीच अवडंबर माजवले नाही. नेहमी साधेपणाणे राहत. अभिनेता म्हणून ३६५ दिवस अभिनयातच रममाण होणारे विजू मामा होते. त्यांच्यामुळेच सुयोगचे नाव झाले.