महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेतून पाटी लावावी, अशी मागणी करत आहे. राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, यासाठी मनसेनं अनेकदा आंदोलनही केलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, असे निर्देश दिले आहेत. यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, याबाबतची मनसेनं आठवण करून दिली आहे.
मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी सोमवारी ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं, “आधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीत व्हायला हव्या आहेत. त्याला आता ५ दिवस उरले आहे. दोन भाषेत पाटी करण्याची दुकान मालकांची इच्छा असेलच तर देवनागरी लिपीतली मराठी भाषा आधी असली पाहिजे आणि मराठीमधील नाव हे बाकी भाषेतील नावापेक्षा मुळीच छोटं नसलं पाहिजे.” महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ असा कायद्याचा संदर्भही शिदोरे यांनी दिला.




हेही वाचा- “ठाण्यातील सभा म्हणजे माझ्या विरोधातील…”, मनोज जरांगेंच्या ठाणे दौऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
अनिल शिदोरे यांची पोस्ट रिपोस्ट करत मनसेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर म्हटलं की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात… शेवटचे ४ दिवस.”