सांगली : मुंबईतील २६-११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या खटल्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मोलाची मदत झाली. न्यायवैद्यक शास्त्रातील प्रगतीमुळेच पकडण्यात आलेल्या कसाबचे वय निश्चित करण्यासाठी आणि न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडण्यात मोलाची मदत झाली, असे मत कायदेतज्ज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवी प्रदान सोहळा आज अ‍ॅड. निकम यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी त्यांनी सांगितले,की न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञ म्हणून महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची चांगली मदत मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या खटल्यामध्ये झाली. त्यांच्या अहवालामुळेच कसाबचे वय निश्चित करता आले. यामुळे कसाबला फाशीची सजा होऊ शकली. महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णसेवेतच राष्ट्रहित आहे हे ओळखून भावी आयुष्यात कार्यरत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. नणंदकर  होते. या वेळी डॉ. राजदेरकर, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. गुरव, डॉ. रूपेश शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. शुभम हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. मिहिर क्षीरसागर यांनी आभार मानले.