राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने काटकसरीचा सल्ला देऊन मंत्र्यांनी शासकीय वाहनांचा वापर शहराबाहेर न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने मंत्री आणि अधिकाऱ्यांनी नवी शक्कल लढवली आणि शासकीय दौरा दाखवून ‘विक एन्ड’ जोमात साजरा केला.
हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आल्यानंतर मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांनी येथील आल्हादायक थंडीचा आनंद घेणे, ही नवीन बाब नाही. मंत्री, आमदार आणि अधिकारी हिवाळी अधिवेशनात विदर्भाचा प्रश्न सोडविण्यासाठी नव्हे, तर पाटर्य़ा करण्यासाठी येतात. जेमतेम दोन-तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनावर कोटय़वधी खर्च होतो. यंदा विदर्भ, मराठवाडय़ामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. अशावेळी मंत्र्यांना काटकसर करण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला, परंतु वर्षांतून एकदा येणारी संधी सोडायला त्यांचे मंत्री तयार नसल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत हे शुक्रवार आणि शनिवारी मेळघाटात होते. त्या भागातील कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यूची मोठी समस्या आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी डॉ. सावंत यांनी हा दौरा काढला. शिवाय, नागझिरा, बोरधरण, पेंच, खिंडसी, तोडाबा व्याघ्रप्रकल्पाची वारी मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांनी केली. गृहनिर्माण, उच्च व तांत्रिक शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी रामटेक, खिंडसी दौरा शनिवारी केला, तर राज्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी पेंच आणि नागझिरा प्रकल्पाला भेट देऊन सुटीचा आनंद घेतला.
गाडय़ांचा ताफा
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गोसखुर्द धरणाला भेट दिली. हा त्यांचा अभ्यास दौरा होता, असे सांगण्यात येते. त्यांना या धरणाची पाहणी कराविशी वाटणे सहाजिकच आहे. त्यामुळेच त्यांनी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपताच धरणाला भेट दिली. त्यांच्यासोबत मुंबई आणि त्यांच्या संपर्कातील पत्रकारही गेले. या दौऱ्यात तब्बल ४० ते ५० वाहनांचा ताफा असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्र्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी एवढय़ा वाहनांचा वापर होणे अलीकडेच्या काळातील बहुधा पहिलीच घटना असावी.