कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. त्यानंतर देशभरातील दिग्गज मंडळींनी कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही कोरोना विरोधात लढण्यासाठी गोरगरिंबाना अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलबद्ध करत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेगळ्या शैलीतील आंदोलनाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावणारे नेता म्हणून बच्चू कडू यांची राज्यभर ओळख आहे. बच्चू कडू यांनी याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलबद्ध करून देत लॉकडाउनमध्ये अनेकांना दिलासा दिला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १६ एप्रिल रोजी संत गाडगे बाबा रोटी अभियानाअंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये गोरगरिंबासाठी अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलब्दध करून दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज ८०० जण या योजनेचा लाभ घेतात. चिखलदरा स्टॉप रेस्ट हाऊस परतवाडा येथे सकाळी ९ ते ११ यादरम्यान जेवण उपलबद्ध आहे.