Premium

महापरिनिर्वाण दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट, महाराष्ट्राच्या राजकारणाचा उल्लेख करत म्हणाले…

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे कान टोचले आहेत.

raj thackeray (11)
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर लोटला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे कान टोचले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत त्यांच्या विचारांची आठवणही राज ठाकरे यांनी करून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे पोस्टमध्ये काय म्हणाले?

एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की, त्यांच्यानंतरसुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, त्यांचे विचार समाजाला प्रेरित करत राहतात.”

राज ठाकरेंनी पुढे लिहिलं, “महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष या भूमीत होऊन गेले. स्वराज्याची मुहूर्तमेढ याच राज्यात रोवली. स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य याच राज्यात आकाराला आलं. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित – पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण याच भूमीतील. हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्यासोबत एक फोटो इथे मुद्दामहून टाकला आहे.”

“कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो. तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे. याचं भान गमावू नये. उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय, तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपणही वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल. आजचा महापरिनिर्वाण दिन यासाठी महत्त्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस. पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन,” असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray post on mahaparinirwan day dr babasaheb ambedkar rmm

First published on: 06-12-2023 at 10:28 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा