पूरग्रस्त भागांमध्ये लोकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेत असून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. मात्र यावेळी महिलांना त्यांच्या गरजेच्या वस्तू आणि कपडे मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणाहून येत आहेत. या पूरग्रस्त महिलांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. मनसे सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील महिलांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवणार आहे.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पूरग्रस्त महिलांसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या आहेत. यामध्ये साड्या, गाऊन, पेटिकोट, अंतर्वस्त्रे आणि सॅनिटरी नॅपकिन्स यांचा समावेश आहे”. लोकांकडून मदत घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“पूरग्रस्त भागातील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत नसल्याचं समाजमाध्यमांतून अनेकांनी सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही पूरग्रस्त गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसुद्धा पाठवत आहोत. नागरिकांनीही सॅनिटरी नॅपकिनची पाकिटं आमच्यापर्यंत पोहोचवावीत”, असं आवाहन शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.