तालुक्यातील वरणगावजळील तपत कठोरा या गावात चिंचेच्या झाडाची फांदी तोडल्याने त्यावरील ३० ते ३५ बगळ्यांच्या घरटय़ांचे नुकसान झाले. यातील २४ पेक्षा अधिक पिलांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. सरपंच, वन्य जीव संरक्षण संस्थेचे कार्यकर्ते आणि वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ३६ पेक्षा अधिक पिलांना वाचविण्यात यश आले आहे.

तपत कठोरा गावात एक जुने चिंचेचे झाड आहे. त्यावर शेकडो पक्ष्यांची वसाहत आहे. त्यावर वास्तव्य करणाऱ्या पक्ष्यांची घाण आणि कचरा त्या भागातून जाणाऱ्या रहिवाशांच्या अंगावर पडते. याविषयी सरपंच प्रशांत पाटील आणि ग्रामपंचायतीने या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.  बगळ्यांची विष्ठा आणि अन्य कचऱ्यापासून दरुगधी पसरते हे रहिवाशांनी सरपंचांना सांगून याविषयी उपाय योजना करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली होती. त्यानंतर सरपंचांनी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिव उदय चौधरी यांच्याशी संपर्क साधून या प्रकारावर काय उपाय करता येईल, अशी विचारणा केली. सध्या पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ असून त्यानंतर ते पक्षी तेथून निघून जातील, असे चौधरी यांनी सांगितले. सध्याच्या समस्येवर उपाय म्हणून त्या झाडाखाली हिरवे कापड किंवा चागले कापड बांधावे. म्हणजे कचरा किंवा पक्ष्यांची विष्ठा रहिवाशांच्या अंगावर पडणार नाही, असा उपाय चौधरी यांनी सरपंचांना सांगितला.

उपायांची अमलबजावणी होण्यापूर्वीच मंगळवारी दुपारी कोणीतरी झाडाची एक मोठी फांदी तोडली. त्या फांदीवर असलेली बगळ्याची ६० ते ७० पिले त्यामुळे जमिनीवर पडली. या घटनेची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेस मिळाल्यानंतर या पक्ष्यांच्या सवर्धनासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सतीश कांबळे, दीपक नाटेकर, भूषण कोळी, विजय कोळी, वैभव बच्छाव आणि इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. सुस्थितीत असलेली २५ घरटी जमा करण्यात आली. यात २६ ते २७ नवजात पिले मृतावस्थेत आढळून आले. जमिनीवर पडलेल्या अन्य ३६ पक्ष्यांच्या पिलांना ग्लुकोज पाजून सुस्थितीत असलेल्या घरटय़ात आणि बांबूच्या टोपल्या बांधून त्यात ठेवण्यात आले, अशी माहिती भुसावळचे वन्य जीव संरक्षण संस्थेचे सदस्य तथा सर्पमित्र सतीश कांबळे यांनी दिली.

याबाबत कठोऱ्याचे सरपंच पाटील कोविड रूग्णांची माहिती घेण्यासाठी आपण बाहेर होतो, असे सांगितले. झाड तोडण्यात येऊ नये म्हणून आपण त्वरित घटनास्थळी धाव घेतली. परंतु, त्याआधीच कोणीतरीे झाडाची एक फांदी तोडली होती. ती व्यक्ती पळून गेली होती. फांदीवरील घरटी आणि त्यातील पिले खाली पडलेली होती. या झाडावर बगळ्यांचा रहिवास असल्याने त्यांच्यापासून निर्माण होणारी विष्ठा आणि अन्य घाणीचा स्थानिकांना आणि त्या भागातून ये-जा करणाऱ्यांना त्रास होत असल्याचेही सरपंचांनी सांगितले.

पक्ष्यांचा विणीचा हंगाम आहे. अजून १५ ते २० दिवसात ही पिले उडण्यास सक्षम झाली असती. जर झाड किंवा फांदी तोडायची असती तर तलाठी कार्यालयातून परवानगी घेऊन नंतर तोडता आली असती. हे अमानवीय कृत्य आहे. वनक्षेत्रपाल बच्छाव यांना याबाबत माहिती कळवली असता त्यांनी तत्काळ दखल घेत वनसंरक्षक मुकेश बोरसे, वन कर्मचारी नथ्थु वानखेडे यांना घटनास्थळी पाठवले. पक्ष्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य बाळकृष्ण देवरे यांनी केली आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर वन परिक्षेत्राचे वनसंरक्षक अधिकारी बच्छाव यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क झाला नसल्याने या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.