सोलापूर : कर्नाटकातील हुबळी-धारवाड भागात एकतर्फी  प्रेमातून झालेल्या नेहा हिरेमठ या तरूणीच्या निर्घृण हत्येचा सोलापुरात कौमी एकता मंचच्या व्यासपीठावर मुस्लीम समाजाने निषेध नोंदविला. नेहा हिचा मारेकरी फय्याज याच्यावर जलदगती सत्र न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणीही करण्यात आली.

हेही वाचा >>> मंगळवेढ्यात हजारो पेंढ्या कडबा पावसाने भिजला; शेतकर्‍यांना फटका

गुरूनानक चौकाजवळील एका सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून तिला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. कौमी एकता मंचचे हसीब नदाफ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम, जमिअत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना हारीस ईशाअती, ज्येष्ठ उद्योजक दत्ता सुरवसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, तौफिक शेख, माजी महापौर महेश कोठे, अंनिसचे रवींद्र मोकाशी, ॲड. गोविंद पाटील, दत्ता थोरे, सर्फराज अहमद, कुरेशी समाजाचे प्रदेशाध्यक्ष हाजी अयुब कुरेशी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रा. अजय दासरी, वीरशैव लिंगायत समाजाचे विजयकुमार हत्तुरे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश नामदेव चव्हाण, काॅग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, ॲड. राजन दीक्षित, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा निषेध करताना लोकसभा निवडणुकीत त्याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-यांपासून समाजाने सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले. शेवटी ईद मिलनाच्या छोटेखानी कार्यक्रमाने सभेची सांगता झाली.