मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली नागपुरातील रेल्वेसेवा अद्यापही पूर्ववत झालेली नाही. सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान  रेल्वेरुळाखालची माती वाहून गेल्याने रेल्वेसेवा बंद झाली आहे. दोन दिवस होत आले तरीही रेल्वेरुळाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काल शनिवार रात्रीपर्यंत रेल्वेसेवा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु, पावसामुळे प्रशासनाला काम करण्यात अडथळे येत आहेत. रुळाखाली तब्बल दहा-बारा फूटांचे खड्डे पडले असल्यामुळे भरावाचे काम करण्यात तितकाच उशीर होत आहे. याठिकाणी रेल्वेप्रशासनाचे  तब्बल ५०० कामगार काम करत आहेत. काम जरी युद्ध पातळीवर सुरू असले तरी, आजही रेल्वेसेवा ठप्पच राहण्याची चिन्हे आहेत
पावसामुळे सिंदी रेल्वे आणि तुळजापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील माती आणि खडी वाहून गेली. ही बाब लक्षात येताच चेन्नई-निझामुद्दिन एक्स्प्रेस वर्धा येथेच थांबवून ठेवण्यात आली. त्यानंतर येणारी त्रिवेंद्रम-नवी दिल्ली केरळ एक्स्प्रेस, चेन्नई-निझामुद्दिन दुरांतो एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा बडनेरा-भुसावळ मार्गे वळवण्यात आल्या. या मार्गावरून धावणाऱ्या सुमारे ७४ रेल्वेगाडय़ांना अतिवृष्टीचा फटका बसला.