लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : देशाच्या विकासासाठी म्हटले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित इंजिन पार बिघडले असून हे इंजिन विकासाकडे नव्हे तर अधोगतीकडे नेणारे आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्याचा समाचार घेतला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पटोले आले होते. यावेळी झालेल्या शक्तिप्रदर्शासह निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गेल्या १६ एप्रिल रोजी सोलापूर लोकसभेचे राम सातपुते आणि माढ्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोन्ही भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित राहून पंतप्रधान मोदी हे देशाच्या विकासाचे शक्तिशाली इंजिन असून त्यामागे महाविकास आघाडीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे डबे जोडले आहेत, असा दावा करताना काँग्रेससह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर शाब्दिक हल्ला चढविला होता. त्यास पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

आणखी वाचा-“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…

ते म्हणाले, भाजपने आणि मोदी-शहा यांनी सतत रेटून खोटे बोलून आणि ‘अच्छे दिन’ आणण्याचे खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली होती. जनतेने मोठा विश्वास ठेवून भाजपला सत्तेची संधी दिली. परंतु सत्तेत आल्यानंतर भाजपने देशाला अस्थिर केले. जनतेची घोर फसवणूक केली. जनता पुनःपुन्हा फसणार नाही, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात सार्वत्रिक नकारात्मक वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या ४० पेक्षा जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticize narendra modis engine is broken and leading the country to decline mrj
Show comments