‘सावाना’ १७३वा वार्षिक उत्सव
सतारीतून हलकेच येणारे सूर अन् तबल्यावर थिरकणारी बोटे, सुरांच्या या जुगलबंदीला तितकीच दिलखुलास दाद देणारा नाशिकचा रसिकवर्ग. निमित्त होते येथील सार्वजनिक वाचनालयाच्या १७३व्या वार्षिकोत्सवानिमित्त आयोजित डॉ. उद्धव अष्टुरकर व तबलावादक मकरंद तुळाणकर यांच्या जुगलबंदीचे.
परशुराम साईखेडकर नाटय़गृहात ही मैफल रंगली. मैफलीच्या प्रारंभी गायिका शमशाद बेगम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर श्यामकल्याणपासून मैफलीला सुरुवात झाली. श्यामकल्याणमध्ये आलाप, जोडझाला, विलंबित गत, विलंबित तीनताल व मध्यलय तीनताल सादर करत उद्धव अष्टुरकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर मध्यलय तीनताल, विलंबित तीनताल सादर करीत मैफलीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. प्रत्येक झंकारला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळत होती. चारुकेशी रागात रूपक ताल, मध्यलय तीनताल गुंफत त्यांनी मैफल रंगवली. मिश्र खमाज मध्ये धून सादर करत मैफलीची सांगता झाली. त्यांना पुण्याचे तुळाणकर यांनी साथ केली. तुळाणकर यांच्या तबलावादनासही रसिकांचा प्रतिसाद मिळाला. कलावंतांचा परिचय विनया केळकर यांनी करून दिला. स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी केले. देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.