एटापल्ली तालुक्यातील घटना; चकमकीत एक नक्षलवादी जखमी, स्फोटकांसह साहित्य जप्त

पोलिस दलाला भूसुरूंग करून लक्ष्य करण्याचा नक्षल्यांचा डाव सोमवारी पुन्हा एकदा फसला. एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटरवरील गट्टागुडा रस्त्यावरील नाल्यावर नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवली. मात्र, नक्षल अभियान राबविणाऱ्या पोलिसांना वेळीच लक्षात आल्याने नक्षल्यांचा डाव उधळला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात एक नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे.

धानोरा, एटापल्ली, भामरागड व अहेरी तालुक्यांत नक्षलवादी हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु कडक पोलिस बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांना जंगलातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एका महिला नक्षलवाद्याला चकमकीत ठार केल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या पोलिस दलाने नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबविले जात आहे. एटापल्ली तालुक्यातील जंगलात नक्षल्यांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळताच पोलिस गट्टाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतांनाच गट्टागुडा रस्त्यावरील नाल्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरूंग पेरून ठेवले असल्याची माहिती मिळाली. नाल्याजवळ स्फोटके पेरून ठेवली होती. क्लेमोर माईन्स बॉम्बचा स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता. हा बॉम्ब स्फोट रिमोटच्या सहाय्याने घडविला जातो. गट्टा पोलिस पथक सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नक्षल शोध मोहीम राबवित असतांना अचानक दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस जात असलेल्या रस्त्यावर रिमोटव्दारे स्फोट घडवून पोलिसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सावध पवित्रा घेत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. ही चकमक तीन तास सुरू होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून व घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवादी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक हरी बालाजी हेलिकॉप्टरव्दारे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाची चौफेर पाहणी करण्यात आली. यावेळी घटनास्थळाहून बॅटरी सिग्नल, वायर, क्लेमोर माईन्स, पाईप इत्यादी बॉम्बचे साहित्य तसेच नक्षल साहित्य मोठय़ा प्रमाणात पोलिसांनी जप्त केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवादी चांगलेच हादरले आहेत. या कारवाईत एक नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळावर पडलेल्या रक्तावरून ही बाब समोर आली. दरम्यान या मोहिमेनंतर पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे.

नक्षलवाद्यांच्या फलकांमुळे गडचिरोली जिल्ह्य़ात दहशत

जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांची फलकबाजी सुरू असल्याने दहशत निर्माण झाली आहे. राज्य व केंद्र सरकार शेतकरीविरोधी आहे, असा आरोप करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन उभारण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिला आहे. भामरागड व एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी सरकारच्याविरोधात मोठय़ा प्रमाणात फलक लावले आहेत. पत्रकार गौरी लंकेशच्या हत्येचा निषेध करून यासाठी भाजप सरकार दोषी असल्याचे म्हटले आहे. राज्य व केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावे आणि लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेच्या वतीने भामरागड व एटापल्ली तालुक्यातील अनेक गावात नक्षली बॅनर, पोस्टर व पत्रके लावण्यात आली आहेत. नक्षलवाद्यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला भाजप सरकारला दोषी ठरविले आहे. विशेष म्हणजे छत्तीसगड व तेलंगणा या दोन राज्यालगतच्या गावांमध्येही असे फलक लावण्यात आले आहेत. तसेच एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यातील काही गावांमध्येही फलक मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीलाही भाजप दोषी असल्याचे यात नमूद केले आहे.