नक्षलवाद्यांकडून पोलिसांची बदनामी, तर आदिवासींची पोलिसांविरुद्ध तक्रार

सूरजागड येथे ८० वाहनांची जाळपोळ हा अपवाद सोडला, तर नक्षलवाद्यांना गेल्या ६ महिन्यात कुठलाही मोठा हिंसाचार घडविता न आल्याने हादरलेल्या नक्षल्यांनी फंट्रल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून खोटा प्रचार करून पोलिस दलाची बदनामी सुरू केली आहे. तिकडे, भामरागड व परिसरातील ४० आदिवासींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन पोलिसांकडून वारंवार मारहाण होत असल्याचे म्हटले आहे. हे सर्व बघता सूरजागड या एका लोह खाणीमुळे पुन्हा एकदा नक्षलवादी-आदिवासी-पोलीस, असा त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.

सूरजागड पहाडावर नक्षलवाद्यांनी २३ डिसेंबरला या वाहनांची जाळपोळ करून लोह खाणीला विरोध असल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले आहे. ही एकमेव हिंसक घटना सोडता नक्षलवाद्यांना गेल्या सहा महिन्यात पोलिस दल किंवा जिल्हा प्रशासनाचे मोठे नुकसान करता आलेले नाही. नक्षलवाद्यांनी स्थानिक आदिवासींमध्ये भीती कायम राहावी यासाठी महिनाभरात सात आदिवासींची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. जाळपोळ, हत्या, पत्रक व बॅनरबाजीच्या माध्यमातून नक्षलवादी चळवळ या भागात जिवंत आहे, असे दाखवून देत आहेत, तर जनजागरण मेळावे, तसेच शाळा व इतर माध्यमातून पोलिस व जिल्हा प्रशासन स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न बघून आता नक्षलवाद्यांनीच पोलिसांची या ना त्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समोर येत आहे. हिद्दुर आणि मुरेवाडा गावाजवळ पोलिस पार्टी नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना पोलिस व नक्षल चकमक झाली. यानंतर जंगलात पोलिसांना २ मुली संशयितरीत्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना विचारणा केल्यावर गोणवारा आणि नईताळा गावच्या असल्याचे व मुरेवाडा येथे नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या २ मुलीस मुरेवाडा गावात नेण्यात आले. तेथे मुलींना कोणी ओळखते का, अशी विचारल्यावर कोणीही त्यांना ओळखले नाही. त्यामुळे या मुलींच्या ओळखीबाबत पोलिसांना अधिक संशय आला.

त्यानंतर त्यांना गट्टा येथे आणण्यात आले. तेथे मुरेवाडय़ाहून दोन व्यक्ती आल्या व त्यांनी २ मुलींना त्यांचे नातेवाईक असल्याचे ओळखले. सी-६० पार्टीच्या नक्षल्यांशी झालेल्या चकमकीनंतर काही समाजकंटक व नक्षल फ्रंटल ऑर्गनायझेशन पोलिसांनी या मुलींसोबत असभ्य वर्तन केल्याचा खोटा संदेश समाजमाध्यमाव्दारे पसरविण्यात येत आहे.

तीन दिवसात झालेल्या विशेष अभियान पथकाच्या चकमकींमुळे नक्षलवादी हादरले असून फ्रं टल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सध्या नक्षलवाद्यांच्या हालचालींना चाप बसला आहे. अशाही स्थितीत समाजमाध्यमावर पोलिसांची बदनामी होईल, असे संदेश वारंवार पाठविले जात आहेत. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हे सर्व संदेश केवळ बदनामीसाठी असल्याचे म्हटले आहे.

तिकडे, भामरागड परिसरातील ४० आदिवासींनी जिल्हाधिकारी नायक यांना निवेदन देतांना पोलिस जबर मारहाण करतात, असे म्हटले आहे. मौजा बेजूर येथील बाबलाई देवीजवळ २१ जानेवारीला आदिवासींनी एकत्र येण्याचे ठरविले होते. पूजेनंतर भामरागड पट्टय़ातील लोकांची ही पहिलीच पारंपरिक बैठक होती. यात हिशेब व आढावा घ्यायचा होता. मात्र, भामरागड पोलिसांनी जमा होण्यास मजाव केला, तसेच रामा दुर्वा (रा. बिनागुंडा) याला बेदम मारहाण केली. त्याचा परिणाम पोलिसी भीतीमुळे गावकरी या कार्यासाठीही एकत्र येऊ शकले नाही. राज्य घटनेने आम्हाला सर्व अधिकार दिले असतांना पोलिस एकत्र येऊ देत नाही, अधिकारांवर गदा आणतात, असा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर सर्व ४० गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे आहेत. दरम्यान, हा सर्व प्रकार बघता या संघर्षांत दोन टोकाला नक्षलवादी व पोलिस आहेत आणि या दोघांमध्ये आदिवासी सापडला असून तो पुरता भरडला जात आहे.