वाई, लोकसत्ता ऑनलाइन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी रात्री उशिरा पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शिवेंद्रराजेंनी आजवर आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. या भेटीत शरद पवार यांनी ‘उदयनराजेंचे मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका’, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. बैठकीनंतरही शिवेंद्रराजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार या बातमीने राष्ट्रवादी काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे. शरद पवार यांनी सुमारे दीड तास शिवेंद्रसिंहराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘उदयनराजेंचं मी बघतो, तुमची पक्षाला आवश्यकता आहे, तुम्ही पक्ष सोडू नका’, अशा शब्दांत पवारांनी शिवेंद्रराजेंना सबुरीचा सल्ला दिला.

मात्र, आपण ३१ जुलै रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे. कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मला जावं लागेल, असं शिवेंद्रसिंहराजेंनी पवारांना सांगितल्याचे समजते. एकंदर शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतरही शिवेंद्रसिंहराजे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वृत्त आहे.

भाजपात प्रवेशाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे स्पष्ट संकेत
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. सोमवारी झालेल्या घडामोडीत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश कारावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला. त्यांनी हा निर्णय घ्यावा यासाठी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत पक्ष सोडण्याची देखील तयारी दर्शवली. भाजपा प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.