अंत्यविधीसाठी सरणावर ठेवलेले प्रेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी नेल्याच्या घटनेमुळे उस्मानाबादेतील वरवंटी गावात खळबळ उडाली. शवविच्छेदन न करताच अंत्यविधी करण्यात येत असल्याचे एका अज्ञात इसमाने फोनद्वारे उस्मानाबाद पोलिसांना सांगितले. त्या निनावी फोनमुळे खून झाल्याच्या संशयातून पोलिसांनी वरवंटी गाठून प्रेत ताब्यात घेतले. अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विधी थांबविला.

त्यानंतर उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं. या घटनेने गावात खळबळ उडाली. उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी गावात ही घटना घडली. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव भगवान बाबुराव सगर असून गेल्या वीस वर्षांपासून सगर यांना मानसिक आजार होता. अधून मधून त्यांना फिट्सही यायची. गेल्या आठ दिवसांपासून त्यांना जास्त त्रास होत होता. त्यामुळे बार्शी येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल. मात्र, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी शवविच्छेदन न करताच प्रेत अंत्यविधीसाठी गावाकडे आणले होते.

पोलिसांना एका निनावी फोनद्वारे प्रकरणात काळंबेर असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून खुनाच्या संशयावरुन उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांनी सरणावर ठेवलेलं प्रेत शवविछेदानासाठी नेल. दरम्यान, निनावी फोनसंदर्भात पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात मृत व्यक्तिच्या कुठल्याही नातेवाईकांची तक्रार नव्हती. मात्र, निनावी फोनवरून पोलिसांनी ही कारवाई केली.