भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात महिला-बाल कल्याण आणि ग्रामविकास खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबूकद्वारे कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली. तर दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील पंकजाच काय राज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने, पंकजा मुंडे भाजपाला लवकरच रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर यावर भाजपाकडून खुलासा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिल्यानंतर, भाजपा नेते विनोद तावडे यांनी देखील माध्यमांशी बोलताना, यासंदर्भात उगाच चुकीचा अर्थ काढायचं काही कारण नसल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा- पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत : चंद्रकांत पाटील

यावेळी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी माझं स्वतःचं बोलणं झालं आहे. १२ डिसेंबर रोजी असणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, अनुयायांना दिलेलं आहे. पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक आहे. महाजन, मुंडे कुटुंबीय व्यक्तिगत नेहमीच ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ राहिलेले आहेत. पण याचा अर्थ म्हणजे काय पंकजा मुंडे भाजपा सोडून शिवसेनेत जातील, असा कधीच होऊ शकत नाही. तसेच, पंकजा मुंडे यांच्या निष्ठेवर भाजपाचा संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी फेसबुकपोस्टद्वारे केवळ त्यांच्या सहकाऱ्यांना आणि अनुयायांना निमंत्रण दिलेलं आहे. उगाच चुकीचा अर्थ काढायचं काही कारण नाही. पंकजा मुंडे पुढे देखील पक्षाचं काम करत राहतील. त्यांनी कोणत्याही गोष्टीची मागणी केलेली नाही. शिवसेनेच्या संपर्कात कोणी भाजपाचे नेते असतील तर ते माहिती नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आणखी वाचा- पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत?, राऊत म्हणाले…

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे नेते व त्यांचे बंधु धनंजय मुंडे यांच्याविरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. हक्काच्या परळी मतदारसंघातून झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचं बोललं जात आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, पंकजा मुंडेंबाबत तुम्हाला १२ डिसेंबरलाच कळेल. पंकजाच काय शिवसेनेच्या वाटेवर अनेक मोठी लोक आहेत, असं सांगितल्याने चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.