शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना; काही पोत्यांची चोरी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात सुरुवातीला नाफेडमार्फत तूर खरेदी केली जात होती. आता तालुका खरेदी-विक्री संघाकडून तूर खरेदी होत आहे. या खरेदी प्रक्रियेत सत्ताधारी पुढाऱ्यांनी लुडबुड करण्यास सुरुवात केल्याने सामान्य शेतकऱ्यांमधून अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. इतकेच नाहीतर खरेदी केलेल्या तुरीची १३ पोती चोरी गेल्याचा प्रकारही घडल्याने ही खरेदी प्रक्रिया चच्रेचा विषय बनली आहे.

खरेदी-विक्री संघातील काही सत्ताधारी पुढारी तूर विक्री व्यवहारात खुलेआम हस्तक्षेप करीत आहेत. नात्यागोत्यातील मंडळींना ते मदत करीत आहेत. नात्यागोत्यातील मंडळींचा तत्काळ नंबर लागून त्याच्या तुरीचा वजनकाटा केला जातो. मात्र, सामान्य शेतकरी आधीपासून मुक्कामी आहेत. त्यांना कोणीच वाली नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. तूर विक्रीतील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवावा, अशी तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

तूर खरेदी केंद्रातून यापूर्वी एका शेतकऱ्याचे तीन पोती चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी बाजार समितीकडे केली होती. या विषयाची चर्चा थांबते न् थांबते तोच आता तालुका खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकाने २८ मे रोजी बाजार समितीच्या सचिवाला दिलेल्या लेखी निवेदनात तालुका खरेदी-विक्री संघाने २६ मे २०१७ अखेर खरेदी करून वजनकाटा केलेल्या तुरीची १५ पोती कमी असल्याचे आढळून आले असून, ती चोरी गेली असल्याची शक्यता वर्तवली असून, या प्रकरणी आपल्या स्तरावरून चौकशी करण्याची विनंती केली आहे. यावरून तूर खरेदी केंद्रातून आता तूर चोरी जाण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र आहे.

शासनाने ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याचे जाहीर केले. या मार्केट यार्डात २९ मेपर्यंत ५ हजार क्विंटलच्या वर तूर खरेदी करून त्याचा वजनकाटा होणे बाकी आहे. १५ हजाराच्या वर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदी केल्या आहेत. मार्केट यार्डात ८ मेपर्यंत तूर विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा माल पडून आहे. त्याचा वजनकाटा होण्यास ३ ते ४ दिवस जातील. तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांच्या तुरीची ३१ मेनंतर विक्री होईल काय, अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात तूर विक्री केली. त्यामध्ये २५ मार्चपर्यंतच्या तूर विक्रेत्या शेतकऱ्यांना धनादेश मिळाले, मात्र त्यानंतरच्या शेतकऱ्यांना विकलेल्या तुरीचे धनादेश मिळणे अद्याप बाकी आहे. तेव्हा या शेतकऱ्यांना तूर विक्रीचे धनादेश कधी मिळणार? आता पावसाच्या तोंडावर शेतकऱ्याला बी-बियाणे, खते यांसारख्या वस्तू खरेदी कराव्या लागतात तेव्हा तूर विक्रीचे पसे कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

५ हजार क्विंटलवर तूर शिल्लक

आत्तापर्यंत या केंद्रावर ४० हजार क्विंटलच्या वर तूर खरेदी झाली. शासनाने ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याचे जाहीर केले. दरम्यान, तूर खरेदी केंद्रावर २६ एप्रिलपर्यंत १२ हजार क्विंटलच्या वर तूर पडून होती. बाजार समिती प्रशासनाने तूरसंदर्भात नोंदणी केंद्र स्थापन केले. या केंद्रावर आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. २९ मे पर्यंत या केंद्रावर ५ हजार क्विंटलच्या वर तूर वजनकाटय़ाविना शिल्लक आहे. नव्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून वीस ते पंचवीस हजार क्विंटल तूर विक्रीस येण्याची शक्यता आहे.