निवडणुकीच्या प्रचाराचं माध्यम गेल्या काही वर्षात सातत्याने बदलताना दिसत आहे. आधुनिक क्रांती झाल्यापासून अनेकविध माध्यमातून पक्षाकडून प्रचार केला जातो. हल्ली सोशल मीडिया हे उत्तम प्लॅटफॉर्म असून इन्फ्लुअन्सर्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे. त्यामुळे विविध इन्फ्लुअन्सर्सना भेटणं, विविध युट्यूब चॅनेल्सच्या पॉडकास्टला मुलाखती देणं सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धी विभागाकडूनही असाच प्रयत्न सुरू असल्याचा दावा ठाकरे गटाचे युवानेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांना होस्ट करण्यास सांगत आहेत.पण मिंधेंना माझं एक आव्हान आहे. त्यांना माझ्यासोबत वन टू वन पॉडकास्ट करू द्या.

या पॉडकास्टमध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुजरातला पाठवलेल्या सर्व उद्योगांबद्दल बोलूया. त्यांनी स्वतःच्या संधीसाठी आमच्या पाठीवर वार केला, पण आमच्या तरुणांनी त्यांच्या नोकरीच्या संधी का गमावल्या? आपल्या राज्यात शेतकरी आत्महत्या का वाढत आहेत, शहरी गुन्हेगारी वाढत आहे आणि महिला असुरक्षित आहेत. पण ते निर्लज्जपणे ठेकेदार मित्रांसाठी आपल्या पदाचा वापर करून महाराष्ट्राला लुटत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर, दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाकरता उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही महाराष्ट्रात जोर आला आहे. याचदरम्यान प्रचारसभाही ठिकठिकाणी गाजत आहेत. त्यामुळे कोण कोणत्या हटक्या पद्धतीने प्रचार करून लोकांपर्यंत सर्वाधिक पोहोचतंय हे पाहावं लागणार आहे.