करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांचे विलगीकरण केल्याची बातमी छापणाऱ्या पानेगाव (ता.नेवासे) येथील एका पत्रकाराच्या घरावर टाळेबंदी असतानाही मोर्चा नेऊ न सुमारे दीड  तास ठिय्या मांडण्यात आला. यावेळी धक्काबुक्की, घरातील वस्तूंची तोडफोडही करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जमाव पांगला. सोनई पोलीस ठाण्यात या प्रकरणी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नेवासे येथे एका पन्नास वर्षांच्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली होती. या व्यक्तीच्या संपर्कात पानेगाव येथील एक तरुण आला. या तरुणाच्या कुटुंबाच्या संपर्कात सुमारे ५५ लोक आले होते. आरोग्य विभागाने त्यांचे घरीच विलगीकरण केले. त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले. विलगीकरणाची ही बातमी पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी दिली. अन्य वृत्तपत्राच्या वार्ताहरांनीही त्या बातम्या दिल्या. पण नवगिरे यांनी अवैध व्यवसायाविरुद्ध बातम्या दिल्याने काहींचा राग होता. अवैध व्यवसायिकांनी लोकांना भडकावले. आज सकाळी नवगिरे यांच्या घरावर सुमारे दीडशे जणांनी हल्लाबोल केला.

नवगिरे यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जमाव आक्रमक होता. ज्यांचे विलगीकरण झाले नाही, वृत्ताशी काहीही संबंध नाही असे लोक आघाडीवर होते. नवगिरे यांनी सोनई पोलिसांना त्वरित दूरध्वनी करून कल्पना दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी प्रसाद देऊ न काहींना पांगविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटनास्थळी आले. त्यांनी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामभाऊ  जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, ग्रामसेवक गणेश डोंगरे, सतीश जंगले, किशोर जंगले, बद्रीनाथ जंगले आदि उपस्थित होते.

नवगिरे यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर जिल्हा पत्रकात संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मन्सूरभाई शेख यांच्यासह पत्रकारांच्या संघटनेने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नवगिरे यांच्यावरील हल्लय़ाची गंभीर दखल घेऊ न कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

नवगिरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून अण्णासाहेब गायकवाड, मिराबाई शेडगे, शोभा पवार, रमेश वाघमारे, संतोष आडांगळे, विजय वाघुले, आबासाहेब वाघुले, रामू किसन गायकवाड, भिमा शेडगे, अंजली गायकवाड यांच्यासह दीडशे जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.